विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला मिळाले जीवदान ; वनविभागाच्या तत्परतेने तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर कोल्ह्याची सुखरूप सुटका

न्यूज ब्युरो चीफ – श्री.श्रीकांत मेलगे, 9421064110

मौजे डोंगरगाव, दि.11: शेतात फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे विहिरीत पडलेल्या एका कोल्ह्याला जीवदान मिळाले. वनविभागाच्या पथकाने तब्बल तीन तास अथक परिश्रम घेत या कोल्ह्याची सुखरूप सुटका करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले. वनविभागाच्या या तत्पर आणि कौतुकास्पद कामगिरीचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.

मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी श्री. हिरालाल कोंडूभैरी हे दुपारच्या सुमारास आपल्या मालकीच्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना विहिरीतून काहीतरी आवाज ऐकू आला. त्यांनी तत्काळ विहिरीत डोकावून पाहिले असता, एक कोल्हा विहिरीत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वनविभागाला याबाबत माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच सोलापूर येथून सहाय्यक वनसंरक्षक ऐश्वर्या शिंदे व वनपरिक्षेत्र अधिकारी शितक चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वाईल्डलाईफ रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. पथकाने घटनास्थळी पोहोचल्यानंतर नियोजनपूर्वक बचावकार्य सुरू केले. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर विहिरीत अडकलेल्या कोल्ह्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

या बचावकार्यात वनपाल श्री. संतोष मुंडे, वनरक्षक विशाल चव्हाण, कृष्णा आण्णा आघडे व संतोष संसदे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत अथक परिश्रम घेतले. तसेच सोलापूर येथील रेस्क्यू टीम सोलापूरचे कृष्णा लिखने, वनसेवक रमेश माने, वनसेवक अण्णा अवघडे, संतोष सरवदे, प्राणीमित्र प्रसाद बोडले व साहिल सनदी, शेतमालक हिरालाल कोंडूभैरी यांनीही बचावकार्यात मोलाची साथ दिली.

विशेष म्हणजे, सणासुदीचा काळ असतानाही वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता, कर्तव्यनिष्ठा आणि वन्यजीवांप्रती असलेली संवेदनशीलता खरोखरच कौतुकास्पद आहे. वन्यप्राण्यांचे संरक्षण ही केवळ वनविभागाची जबाबदारी नसून, ती प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे, याची जाणीव या घटनेतून पुन्हा एकदा झाली आहे.

शेतकऱ्याची सतर्कता, वनविभागाची तत्परता आणि प्राणीमित्रांचे सहकार्य यामुळे एका मुक्या जीवाला नवजीवन मिळाले. माणुसकी आणि निसर्गप्रेमाचा सुंदर प्रत्यय देणारी ही घटना परिसरासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे.

दुष्काळाची झळ वन्यजीवांनाही? विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने दिले जीवदान!

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या घटनेने वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. परिसरातील पाणवठे आणि नैसर्गिक जलस्रोत आटत चालल्याने वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधात शेतशिवाराकडे यावे लागत असेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विहिरीत पडलेला हा कोल्हाही पाण्याच्या शोधात आला असावा का, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेतून वन्यजीवांसाठी नैसर्गिक पाणवठे उपलब्ध करून देण्याची आणि त्यांचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here