बालाजीनगर आश्रम प्रशालेला ‘ज्ञानयात्री आदर्श शाळा’ पुरस्कार तर प्राचार्य गणपती पवार यांची ‘ज्ञानयात्री आदर्श प्राचार्य’ म्हणून निवड

मंगळवेढा, दि. २२: शिक्षण क्षेत्रामध्ये तब्बल ३९ वर्षे अविरत व उल्लेखनीय सेवा बजावणारे ज्ञानयात्री प्राचार्य डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर यांच्या वतीने बालाजीनगर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर येथील प्राथमिक/माध्यमिक आश्रम प्रशाला, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची ‘ज्ञानयात्री आदर्श शाळा’ म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच संस्थेचे प्राचार्य श्री. गणपती राजाराम पवार यांची ‘ज्ञानयात्री आदर्श प्राचार्य’ म्हणून निवड करण्यात आली आहे.

राष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्याच्या निर्मितीत प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, क्रीडा शिक्षक, कला शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निःस्वार्थ सेवा, समर्पित कार्यशैली आणि शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार वितरण सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.


बालाजीनगर येथील आश्रम प्रशालेने शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव आणि विविध कौशल्यांची जोपासना करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्राचार्य गणपती पवार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीला मिळालेली दिशा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न आणि सामाजिक बांधिलकीचे कार्य यांचा गौरव म्हणून त्यांची ‘ज्ञानयात्री आदर्श प्राचार्य’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
२३ ऑगस्टला स्वेरीत पुरस्कार वितरण या प्रेरणादायी पुरस्काराचा वितरण सोहळा रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज, गोपाळपूर येथे होणार आहे. या सोहळ्यास बालाजीनगर येथील संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून हा सन्मान स्वीकारावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करणारा हा सन्मान बालाजीनगरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण ठरणार आहे.

या निवडीबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक श्री गणेश सोनटक्के,  श्री बालाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्रीमती तुळसाबाई लालसिंग रजपूत, सचिव राहुल रजपूत, उपाध्यक्ष शिवलाल जाधव, मार्गदर्शक उत्तमसिंग रजपूत, अमरसिंग रजपूत, सहसचिव अप्पासाहेब पाटील, आश्रमशाळा निरीक्षक शितलकुमार कंदलगावकर, माजी सरपंच हरिश्चंद्र रजपूत, मुख्याध्यापक विलास पवार, पर्यवेक्षक कुंडलिक पवार आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here