आज साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांची पुण्यतिथी आहे.१८ जुलै १९६९ रोजी अण्णा भाऊ अनंतात विलीन झाले. जी माणसं जगावं कसं हे समाजाला शिकवतात त्या थोर व्यक्तिमत्त्वांच स्मरण पुण्यतिथीला आणि उत्साहाने अभिवादन जयंतीदिनी केलं जातं ! आज अण्णा भाऊंचा पुण्यतिथीनिमित्त त्यांचं स्मरण सर्व महाराष्ट्रवासियांनी नव्हे तर भारतीयांनी विशेषतः दलित, वंचित, कामगार, भटके विमुक्त आणि एकूणच बहुजन समाजाने करणे क्रमप्राप्त आहे.
आज अण्णा भाऊंना साहित्यरत्न, साहित्य सम्राट, लोकशाहीर, सत्यशोधक तर कोणी कॉम्रेड या उपाध्या लावतं, परंतु या सर्व उपाध्यांच्या पलीकडे जाऊन अण्णा भाऊंच्या योगदानाची नोंद घेण आजच्या सामाजिक विसंगतीच्या काळात सुसंगत ठरणार आहे.
माणूस हा विचारांचा पाईक असतो. जीवनात त्याला अनेक विचारांशी सामना करावा लागतो. धर्मनिरपेक्ष, भांडवलशाही, लोकशाही, हुकूमशाही, समाजवाद, साम्यवाद,पुरोगामी परंपरावादी, वास्तववाद या रूढ विचारा बरोबरच काही महापुरुष स्वतःचा एक नवविचार जगाला देतात. त्यातूनच नेहरूवाद, आंबेडकरवाद, मार्क्सवादअसे शब्द तयार होतात. त्याकाळी अण्णा भाऊंच्या आजूबाजूला देखील अनेक विचारांचे गारुड घोंगावत होत. परंतु अण्णा भाऊंच्या तत्त्वज्ञानाचा पाया मार्क्स -आंबेडकर हा होता. म्हणून, ‘मार्क्स आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जोडणारा दुवा म्हणजे अण्णा भाऊ साठे होत’, असे कॉ.तानाजी ठोंबरे यांचे निरीक्षण आज सार्वत्रिकदृष्ट्या अचूक आणि वास्तववादी ठरत.
अण्णा भाऊ हे परिवर्तनवादी, युगप्रवर्तक क्रांतिकारक विचारवंत आणि लेखक होते. त्याचबरोबर ते एक गिरणी कामगार होते.
एकजुटीचा नेता झाला कामगार
तैयार
बदलाया रे दुनिया
सारी दुमदुमली ललकार
सदा लढे मरणाशी ज्याला नचठावे शांती
रक्त आटवून जगास नटवून जगण्याची भ्रांती
उठला खवळू झुंज झुंजण्यला
वादळ उठवून बांध फोडण्याला
निश्चय झाला पाय उचलला चालू लागला करण्या नव प्रहार ||
असे म्हणत त्यांनी स्वतःला कामगार चळवळीत झोकून दिले होत. धारावीच्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना त्यांनी,’ ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे.’अशी हाक दिली. त्यांनी कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली.१९३८ ते १९४४ पर्यंत गिरण गावातील कामगारांच्या प्रत्येक लढ्यात, आंदोलनात, संघर्षात ते सामील होते.१९४४ मध्ये ‘लाल बावटा कलापथकाची’ स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. सर्वसाधारणपणे इतरांनी एकच पारतंत्र भोगलं तर अण्णा भाऊंनी गरिबी आणि अस्पृश्यता असे तिहेरी पारतंत्र त्याकाळी भोगलं होतं.
अण्णा भाऊंचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी वाटेगाव, जि. सांगली येथील निवडुंगाच्या फडा पलीकडे असलेल्या मातंग वस्तीत झाला. त्यांच्या आईचे नाव वालूबाई, तर वडिलांचे नाव भाऊ होतं. खरंतर अण्णा हे त्यांचं टोपणनाव होत.त्यांचे मूळ नाव तुकाराम होतं. पुढे सर्वजण सवयीने त्यांना ‘अण्णा भाऊ’ असे म्हणू लागले. गरिबी, अस्पृश्यता आणि गुन्हेगारी वारस्याने मिळालेल्या अण्णा भाऊंना पद्धतशीरपणे शाळा शिकता आली नाही. गरिबीची तमा न बाळगता तुकाराम आपल्या नादातच बालपण घालवत होता. एका जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटलांचे भाषण ऐकले आणि अक्षरशः ते भारावून गेले. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याची भाषा अण्णा भाऊ बोलू लागले. त्यांच्या आई-वडिलांच्या लक्षात ही गोष्ट आली. ‘पोरगं हाताचं जाणार’, असं त्यांना दिसू लागलं. अशातच त्यांच्या वडिलांनी पोटासाठी बिऱ्हाड मुंबईला हलवलं. अण्णा भाऊ अकरा वर्षाचे असताना, बहिण भागुबाई,भाऊ शंकर आणि आई-वडिलांसह अंगावर फाटके कपडे, डोक्यावर लहान मोठी गाठोडी आणि सर्वांना अख्या प्रवासात साथ देणारी भूक यासह पायी चालत ते मुंबईला रवाना झाले. तेथे त्यांनी घरगडी, हॉटेल बॉय, हमाल,बूट पॉलिश वाला,डोअरकीपर, कोळसे वाहणारा, कुत्र्याला सांभाळणारा, खाण कामगार, पाईप लाईन टाकणारा कामगार, विजेच्या तारा ओढणारा कामगार, सिनेमाचे पोस्टर चिकटवणे, सिनेमांची जाहिरात करणे असे विविध प्रकारचे कामे केली. पुढे त्यांच्या आयुष्याची वाटचाल सायन येथील लेबर कॅम्प मध्ये सुरू झाली. तेथेच त्यांची सामाजिक जडणघडण झाली. तेथे त्यांची शाहिरी प्रकटू लागली. त्यांचा ‘मच्छरावरील पोवाड्या’ मुळे कार्यकर्ते प्रभावित झाले. अण्णाभाऊंनी नायगाव मिल आणि कोहिनूर मिल या गिरण्यांमध्ये उमेदवारी केली. अण्णा भाऊंनी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. पक्षाचे ते पूर्णवेळ कार्यकर्ते व प्रचारक बनले. वाचन,बौद्धिक चर्चा,अभ्यास शिबिरे सभा,मेळावे, मोर्चे, संप,टाळेबंदी हरताळ या सर्वात अण्णा भाऊ कष्टकरी वर्गाच्या साथीला खंबीरपणे उभे राहिले.
प्रखर बुद्धिमत्ता, शरीराची चपळता, पाठांतराची जबरदस्त क्षमता, आवाजात धारदारपणा,विविध वाद्यात पारंगतता याच्या बळावर त्यांनी वारणेच्या खोऱ्यात तमाशाचे रूप बदलून टाकलं. कष्टकऱ्यांना कृतीप्रवण करणारा प्रबोधनपर ‘लोकनाट्य’ ही संकल्पना त्यांनी उभी केली. मुंबईच्या चिराग नगर मध्ये राहत असताना अण्णा भाऊनी ‘फकीर’ सारखी अजरामर कादंबरी लिहिली. पुढे त्यांनी ३५ कादंबऱ्या, १४ कथासंग्रह, १० पोवाडे, १३ लोकनाट्य, ३ महानाट्य आणि १ प्रवास वर्णन लिहले . त्यांच्या सात कादंबऱ्यावर आधारित मराठी चित्रपट निघाले. अण्णा भाऊंच्या साहित्याचे विशेष म्हणजे ते माणसाच्या सुखदुःखाचा, जय पराजयाचा साथीदार होत असे . अण्णा भाऊ एखाद्या मनोऱ्यात बसून स्वप्नरंजनात दंग होत लिहित नसत. एकूणच अण्णा भाऊंच्या जगण्याचे, चळवळीचे व साहित्याचे ध्येय हे सामान्य माणसाचे जीवन सुंदर करावे, संपन्न करावे असे होते.अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य जगातील २७ भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. त्या काळातील एकसंघ कम्युनिस्ट पक्षांनी भारतातील विविध भागातून आपली भूमिका मांडण्यासाठी ज्या ज्या लेखकांना पुढे केले होते त्यामध्ये बंगाल मधून महाश्वेतादेवी, दक्षिण भारतातून शरदचंद्र तर महाराष्ट्रातून अण्णाभाऊ साठे हे प्रामुख्याने होते. त्यापैकी महाश्वेता देवी व शरदचंद्र यांना ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ मिळाले आहेत. परंतु अण्णा भाऊंना या पुरस्कारापासून वंचित ठेवण्यात आले आहे.अण्णा भाऊंनी विविध साहित्य प्रकार हाताळले.आपल्या साहित्यातून शोषण, अन्याय,अत्याचाराला विरोध करणे हेच त्यांनी ध्येय मानले व मानवी वृत्ती, प्रवृत्तीचे वास्तव दर्शन वाचकांना घडविले. शब्दांना अंगाराचे रूप देऊन दलितांच्या निर्जीव मनाला चेतवत अण्णा भाऊ मराठी साहित्यातील अढळ पदावर विराजमान झाले आहेत.
अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले. मराठी भाषिकांचे हे महाराष्ट्र राज्य सहजासहजी तयार झाले नाही.
यासाठी १०६ हुतात्म्यानी आपले बलिदान दिले आहे. सेनापती बापट, एस. एम. जोशी, प्र .के .अत्रे, श्रीपाद डांगे , प्रबोधनाकार ठाकरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शंकरराव देव, दादासाहेब गायकवाड, भाई उद्धवराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील या दिग्गज नेत्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांच्याबरोबरच अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, दत्तोबा गव्हाणकर यांचे या चळवळीतील योगदान शाहिरी ,पोवाडे आणि लोकगीतांच्या माध्यमातून जनमानस तयार करणे व चळवळीत लोकसहभाग वाढवणे या अंगाने महत्वपूर्ण आहे. मुंबई ही महाराष्ट्राला मिळावी यासाठी डफावर थाप मारून ‘माझी मैना गावाकडं राहिली.. माझ्या जिवाची होती या काहिली’ हे रूपक गीत अण्णा भाऊंनी रचले.जे आज सुद्धा अनेकांना वेड लावते. हा गीत प्रकार ‘छक्कड’ म्हणून ओळखला जातो. या गीतामधून अण्णा भाऊंनी त्या काळातील सामाजिक, राजकीय, कृषी जीवन ,अलंकार याचे वर्णन खुमासदारपणे केले आहे. बेळगाव, कारवार आणि निपाणी हा भाग आज देखील महाराष्ट्रात नाही, याबाबतची खंत त्याकाळी सुद्धा अण्णा भाऊ या गीताच्या शेवटी व्यक्त करतात. कसलीही अपेक्षा न करता शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर द.ना. गव्हाणकर या त्रिकुटांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकगीतांच्या माध्यमातून धगधगत ठेवली होती.
संयुक्त महाराष्ट्र समितीच्या प्रत्येक सभेची, मेळावे, संमेलने आणि मोर्चे यांची सुरुवात लालबावटा कलापथकाच्या प्रेरणादायी शाहिरीने होत असे.
अण्णा भाऊंचे साहित्यातील योगदान, कामगार चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय सहभाग या सर्वांची दखल घेऊन १९६१ मध्ये ‘इंडो सोव्हएत कल्चर सोसायटीने’ त्यांना रशियात आमंत्रित केले. त्यांचा तेथे गुणगौरव केला व मान सन्मान दिला.
आज अण्णाभाऊंच्या मृत्यूला ५० पेक्षा अधिक वर्ष झाली आहेत.काळ बदलला, प्रश्न बदलले, जगण्याची पद्धती बदलली, साहित्य बदललेले व त्यांची अभिरुचीही बदलली. मग आपल्या जगण्यात आता अण्णा भाऊंची आपणाला साथ मिळणार आहे का? याचे उत्तर जे लोक महापुरुषांच्या मूर्ती पूजनाचा मागवा घेतात त्यांना ‘नाही’ असे मिळेल; तर जे विचारांचा मागवा घेतात त्यांना याचे उत्तर ‘हो’ असेच मिळेल. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचे स्मरण आज आपण करूया…
श्री.- किशोर जाधव, सोलापूर
( लेखक मुक्त पत्रकार म्हणून गेल्या अनेक वर्षापासून विविध वर्तमान पत्रातून लेखन करीत आहेत.)
मो.नं .९९२२८८२५४१