पंढरपूर, दि.१७ : आज आषाढी वारीचा अर्थातच देवशयनी एकादशी सोहळा आहे. यानिमित्त पंढरपूर येथे सुमारे पंधरा लाख भाविक दाखल झाले असून टाळ – मृदुंग, भजन, विठूनामाच्या गजराने अवघी पंढरपूर नगरी दुमदुमून निघाली आहे.
आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांची पत्नी लता शिंदे यांच्या यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी अंबासन, ता. सटाणा, जि. नाशिक येथील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि त्यांची पत्नी आशाबाई यांना महापूजेचा मान मिळाला. ते मागील सोळा वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक मोठ्या उत्साहात विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापूजा केली. यावेळी त्यांनी बळीराजाला, कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, आपलं राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, राज्यातील प्रत्येक माणसाला चांगले दिवस येऊ देत असं विठुरायाचरणी साकडं घातलं.