मंगळवेढा, दि.17 : संतांची भूमी असलेल्या मंगळवेढ्यातील संत परंपरेतील महान संत चोखामेळा यांचे दर्जेदार स्मारक उभारणी संदर्भातील काम लवकरच दृष्टिक्षेपात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे असे माध्यम प्रतिनिधीशी बोलताना आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.
राज्याच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात देहू व आळंदी सोबत मंगळवेढा येथील संत चोखामेळा यांच्या स्मारकासाठी पंचवीस कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत वारी परिवार सक्रियपणे या प्रश्नाबाबत पाठपुरावा करीत असल्याने आषाढी वारी आढावा बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूर दौऱ्यावर आले असता त्यांची भेट घेत स्मारक उभारणी बाबत वारी परिवाराचे सतीश दत्तू, प्रा विनायक कलुबर्मे, सोमनाथ आवताडे, गणेश ओमणे, प्रफुल्ल सोमदळे, शशिकांत चव्हाण, अविनाश शिंदे, जयराज शेंबडे, सुदर्शन यादव या पदाधिकारी शिष्टमंडळाना घेवून तात्काळ निधी वर्ग करून काम सुरू करणेबाबत संबंधित विभागाला आदेश व्हावेत ही विनंती केली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हा प्रश्न काही दिवसात मार्गी लागणार असल्याचे आमदार आवताडे यांनी सांगितले.
संत चोखोबानी भक्तीमार्गात जात, पंथ यांसारख्या भेदभावांना विरोध करून नवी मूल्ये प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. काही श्लोकांमध्ये संत चोखामेळा यांनी अस्पृश्य असण्याची वेदना मांडली आहे. संत चोखामेळाच्या काळात प्रस्थापित धार्मिक मूल्यांना विरोध करणे हे कठीण आणि धाडसाचे काम होते. परंतु संत चोखामेळा यांनी बहुजन समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना नीती आणि तत्त्वज्ञानाची वास्तविक मूल्ये ओळखून देण्यासाठी कष्ट घेतले. अशा या महान संतांच्या कार्याचा गौरव व्हावा त्यांच्या कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा मध्ये अनेक राज्यातील कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येत असतात त्यांच्या कार्याची महती भव्य स्वरूपात व्हावी या दृष्टिकोनातून दर्जेदार स्मारक उभारणी बाबतचा शासनाकडे असलेल्या प्रस्ताव मंजूर झाला असून यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे आमदार आवताडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.