मोहोळ, दि. 7 : ग्रामीण भागातील गोरगरीब व बहुजन समाजाचे शिक्षण अडचणीत येईल अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. समाज सुधारकांच्या मेहनतीने शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले असले तरी येऊ घातलेल्या धोरणांमुळे परिवर्तनाचे चक्र उलट्या दिशेने फिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. म्हणूनच समाजाच्या जनजागृतीसाठी शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी केले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मोहोळ शाखेची संवाद बैठक जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पवार यांनी शिक्षक समिती ही शिक्षकांच्या प्रश्नांसोबतच शिक्षणाच्या प्रश्नी जागरुक असणारे संघटन असून शिक्षणाचे खाजगीकरण, समूह शाळा व दत्तक शाळा योजना, संच मान्यतेचा नविन शासन निर्णय तसेच विद्यार्थी लाभाच्या योजनांच्या अंमलबजावणीत वारंवार होणारे बदल याचा ग्रामीण भागातील शिक्षणांवर परिणाम यासंबंधी मार्गदर्शन केले. बहुजन समाजाच्या शिक्षणापुढे निर्माण झालेली ही अडथळ्यांची शर्यत रोखण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन हा लढा लढावा लागेल त्यासाठी शिक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी तालुका व जिल्हा स्तरावरील प्रलंबित प्रश्नावर उहापोह करण्यात आला. शिवाय संघटनात्मक धोरणे बांधणी , तालुका शाखा अधिवेशन , वर्धापन दिन उपक्रम , गुणवंत विद्यार्थी व शिक्षक सत्कार सोहळा, सभासद नोंदणी अभियान इत्यादी बाबींवर चर्चा करण्यात आली. अध्यक्ष धर्मराज चवरे व सरचिटणीस राजेंद्र बारबोले यांनी बी.एड. परीक्षेत धवल यश संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी प्रफुल्ल शेटे , विजयप्रसाद गोडसे , सुनिल पवार , सुधीर मोटे यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न मांडले.
यावेळी शाखा कामकाज आढावा धर्मराज चवरे यांनी मांडला . जिल्हानेते राजन ढवण यांनी जिल्हा व तालुका पातळीवरील प्रश्न व संघटनात्मक बाबींवर चिंतनशील मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बिरमल खांडेकर, रावसाहेब सुर्यवंशी, चंद्रकांत पवार, ईश्वर वाघमोडे, ज्ञानेश्वर गुंड,चरण शेळके , विश्वासराव औताडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन रमेश साठे यांनी केले तर आभार गजानन कादे यांनी मांडले. यावेळी तालुक्याच्या सर्व भागातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.









