बालाजीनगर, ता.०३ : थोरा-मोठ्यांचे फोटो डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा त्यांच्या विचारांची पेरणी केली तर ते अधिक चांगले होईल. बालाजीनगर सारख्या ओसाड माळरानावर शिक्षणाची गंगा आणणाऱ्या स्वर्गीय लालसिंग रजपूत सर यांच्या विचारांची पेरणी केली तर येथील विद्यार्थी जागतिक पातळीवर नाव कमवतील. आपल्या आश्रम शाळेतील गुणवत्ता पाहून येथे विद्यार्थी प्रवेशाची रांग लागली पाहिजे असे त्यांना अभिप्रेत होते. स्वर्गीय लालसिंग रजपूत सर यांना अभिप्रेत असलेले शिक्षण देऊन आपला नावलौकिक वाढवूया असे मत श्री बालाजी शिक्षण मंडळाचे सचिव राहुल रजपूत यांनी व्यक्त केले.
बालाजीनगर ( ता.मंगळवेढा) येथे श्री बालाजी शिक्षण मंडळ बालाजीनगरचे संस्थापक स्वर्गीय लालसिंग रजपूत यांच्या जयंती सोहळ्याचा सांगता समारंभ, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती, प्रा. दिलीप धायगोंडे यांचा सेवापूर्ती सोहळा, दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री बालाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष प्रा.शिवलाल जाधव हे होते. यावेळी व्यासपीठावर सहसचिव आप्पासाहेब पाटील, मार्गदर्शक अमरसिंग रजपूत, संचालक पोमा रजपूत, मंगळवेढा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अरुणा माळी, मंगळवेढा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती राजाराम जगताप, नंदुरच्या सरपंच सुमन गोडसे, बालाजीनगरचे माजी सरपंच हरिश्चंद्र राठोड, बसवकल्याणचे नगरसेवक बसवराज बालेकिल्ले, जत हायस्कूल जतचे उपमुख्याध्यापक अशोक धायगोंडे, बसवराज धायगोंडे, उद्योजक सोमनाथ माळी, सलगरचे माजी सरपंच जयश्री धायगोंडे, कागष्ट गावचे सरपंच शांपल काकेकर, ज्योतिबा शिक्षण मंडळाचे सचिव दामाजी शिंदे, सेवानिवृत्त प्राचार्य सुनील नष्टे, सेवानिवृत्त शिक्षक प्रा.बापुराया शिंदे, महादेव राठोड, मच्छिंद्र पवार, तुकाराम म्हेत्रे, सेवानिवृत्त सत्कारमूर्ती प्रा. दिलीप धायगोंडे, प्राचार्य गणपती पवार, मुख्याध्यापक विलास पवार, पर्यवेक्षक कुंडलिक पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मुख्यमंत्री वसंतराव नाईक, लालसिंग रजपूत यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रशालेतील मुलींनी बंजारा गीत सादर करून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व सेवानिवृत्त सहशिक्षक प्रा. दिलीप धायगोंडे यांचा सत्कार करण्यात आला.
मंगळवेढा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष अरुणा माळी यावेळी म्हणाल्या की, स्वर्गीय लालसिंग रजपूत यांनी शाळेच्या रूपाने जे रोपटे लावले आहे त्याचे रूपांतर आता वृक्षात झाले आहे, निश्चितच या वृक्षाचे रूपांतर वटवृक्षात होईल. आजच्या धावपळीच्या युगात पालकांना आपल्या पाल्यांसाठी वेळ नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची सारी जबाबदारी शिक्षकांवर आहे. ही जबाबदारी आपण अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडत असल्याचे पाहून समाधान वाटले. यावेळी प्रा. शिवलाल जाधव, प्रा. बापूराया शिंदे,सेवानिवृत्त प्राचार्य सुनील नष्टे, महादेव राठोड, प्रा.पुंडलिक पवार, मल्लिकार्जुन चौगुले, शहाजी पवार यांनीही आपल्या मनोगतातून स्वर्गीय लालसिंग रजपूत सर यांच्या स्मृती जागवल्या तसेच प्रा.दिलीप धायगोंडे यांना सेवापुर्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना प्रा. दिलीप धायगोंडे यांनी सांगितले की, शाळेत सेवा बजावत असल्यापासून या संस्थेने, गावातील प्रत्येक नागरिकांनी व सहकारी यांनी नेहमीच मला खूप प्रेम दिलं. येथे कार्यरत असताना स्वर्गीय विठ्ठल राठोड, प्रा. शिवलाल जाधव, प्रा. बापूराया शिंदे हे माझे मार्गदर्शक म्हणून नेहमीच पाठीशी असायचे. येथे सेवा करत असताना घरदार, शेती याचा कधीही विचार केला नाही, नेहमीच प्रामाणिकपणे सेवा केली त्यामुळे आयुष्यात मला कधीही काही कमी पडले नाही. दररोज शाळेला आल्यानंतर लालसिंग सरांच्या फोटोला अभिवादन करूनच कामाला सुरुवात करायचो त्यामुळे एक प्रकारची ऊर्जा यायची. सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यात या बालाजी शिक्षण संकुलातील साऱ्या आठवणी नेहमीच सोबत राहतील.
प्रास्ताविकात प्राचार्य गणपती पवार यांनी सांगितले की, स्वर्गीय लालसिंग रजपूत यांनी खूप कष्ट करून या शाळेची उभारणी केली. या शाळेतून घडलेल्या विद्यार्थ्यांनी आपला नावलौकिक मिळवावा हे त्यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण आम्ही सारे प्रयत्न करीत आहोत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सचिन कुलकर्णी यांनी तर आभार प्रा.मल्लेशा आरकेरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बालाजी शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.