बालाजीनगर, दि.०२ : मराठी या मराठी टिव्ही वहिनीच्या माध्यमातून आज बालाजीनगर (ता.मंगळवेढा) येथील श्री बालाजी शिक्षण संकुलात सन मराठी आयोजित आनंदी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात प्रा. वनमाला बाळासाहेब भगरे यांनी प्रथम क्रमांक मिळवित मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या.
बालाजीनगर येथील प्राथमिक/ माध्यमिक आश्रम प्रशाला, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बालाजीनगर येथे प्राचार्य गणपती पवार यांच्या संयोजनाखाली सन मराठी टीव्ही आयोजित आनंदी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे दोन तास चाललेल्या या सोहळ्यात निवेदक तथा अभिनेते जयवंत भालेकर यांनी आपल्या उत्कृष्ट निवेदन शैलीने सर्व महिलांना बोलते केले. महिलांच्या धकाधकीच्या आयुष्यात थोडा विरंगुळा मिळावा या मुख्य उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध स्वरूपाचे प्रश्न, संगीत खुर्ची, गाणी आदी विविध बाबीचे सादरीकरण करत उपस्थित साऱ्याच महिलांना आनंदी सोहळ्यात सहभागी करून त्यांचा आनंद द्विगुणीत केला.
आनंदी सोहळ्यातील विविध स्पर्धात यश प्राप्त केलेल्या महिलांना भरघोस अशी बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त प्रा. वनमाला बाळासाहेब भगरे, द्वितीय क्रमांकाच्या मानकरी सारिका दत्तात्रय मासाळ तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्या सरस्वती बाबू वाघमोडे यांना प्राचार्य गणपती पवार, मुख्याध्यापक विलास पवार, अधीक्षिका संगीता पवार, सहशिक्षिका पद्मावती राठोड, निवेदक जयवंत भालेकर यांच्या शुभहस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
सन मराठी टीव्ही आयोजित आनंदी सोहळ्यासाठी बालाजी नगर परिसरातील बहुसंख्य महिलांनी आपला सहभाग नोंदवला.