मंगळवेढा, दि.३० : आत्मभान म्हणजे समतेचा पुरस्कार करणारा, आत्मशोध घेणारा, आनंद देणारा, विचार करायला लावणारा, अंतरी प्रेरणा देणारा आणि वाचकांना मंत्रमुग्ध करून सुरेख व सुंदर कथांनी नटलेला आत्मभान हा कथासंग्रह आहे. लेखिका रेश्मा गुंगे यांनी चिंतनशील वृत्तीने, शोधक मनाने, गुणग्राहकतेने आणि मुख्य म्हणजे परिवर्तनवादी, सुधारणावादी पुरोगामी विचाराची पेरणी करत तमाम स्त्रियांच्या दुःखाला वाट मोकळी करून दिली आहे. आत्मभान हा स्त्री जाणिवांचा सशक्त अविष्कार असलेला कथासंग्रह आहे असे विचार डॉ.श्रुतीश्री वडगबाळकर यांनी शिवशाही बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोणेवाडी यांनी आयोजित केलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात व्यक्त केले.
डॉ. वडगबाळकर पुढे म्हणाल्या, स्त्री ही विधात्याने निर्माण केलेली सुंदर कलाकृती आहे. स्त्रीचे भावविश्व अनेकांनी विविध पद्धतीने अधोरेखित केलेले आहे. स्त्रियांकडे पाहणारा समाज, आपली समाज व्यवस्था या समाज व्यवस्थेने ठरवून दिलेलं वर्तुळ, बेगडी विचारधारेचे ओझं घेऊन जगणाऱ्या कित्येक माय माऊलीच्या संघर्षाची, अवहेलनेची, निराशेची, असमानतेची, तिरस्कारची, आत्मभान हरवलेल्या कित्येक स्त्रियांना स्वसामर्थ्याची, स्वक्षमतेची जाणीव करून देणारा आत्मभान हा कथासंग्रह आहे.
आत्मभान पुस्तकावर भाष्य करताना लेखिका निकिता पाटील म्हणाल्या, या कथासंग्रहातील विविध विषयांचा कानोसा जर घेतला, तर निराशेतून आशावादाकडे, संघर्षातून समृद्धीकडे, शिक्षणातून परिवर्तनाकडे घेऊन जाणारी विचारधारा वाटते. आत्मभान हा कथासंग्रह स्वतःबद्दलची स्वतःलाच जाणीव करून देणारा विचार आहे.
प्रा. सविता दुधभाते यांनी समाज रथाची स्त्री आणि पुरुष ही दोन चाके आहेत. यातील एक चाक गळून पडलं की समाजाचा रथ समतोल साधणार नाही, वैचारिक विषमतेच्या विचारधारेत अडकून स्त्रीची होणारी कुचंबना थांबवावी लागेल. यासाठी तिच्यातील विचार, क्षमता, निर्णयाचे स्वातंत्र्य मिळाले तर सन्मानाच्या पायरीवर स्वतःला घेऊन जाता येते हे आत्मभानातून जगण्याचा कानमंत्र समस्त स्त्री जातीला मिळतो.
प्रकाशन समारंभाचे अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे , यावेळी व्यासपीठावर माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत,ॲड बिराप्पा जाधव, निवृत्ती कडलासकर, माजी सभापती संभाजी गावकरे, मुख्याध्यापक नंदकुमार व्हरे, डॉ. सुभाष कदम, ईंग्लिश स्कूलचे उपमुख्याध्यापक सुनील नागणे, लेखिका रेश्मा गुंगे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित
मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या समारंभास अक्कलकोटच्या आरती काळे, धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन शोभाताई काळुंगे, प्रा. लता गरंडे, स्वाती गुंगे, सारिका गावकरे, डॉ.अतुल निकम, अंबादास निकम, निवेदक बालाजी शिंदे, दयानंद धसाडे, मुख्याध्यापक राजेंद्र नलवडे, राजेंद्र माळी, विष्णू मासाळ, श्री.गरंडे, दाजी लेंडवे, पांडुरंग भाकरे, मुख्याध्यापक चौगुले, पंडित पाटील, भारत लेंडवे, तानाजी चव्हाण, महादेव लेंडवे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक जयंत पवार, बाळासाहेब जावळे यांनीही यावेळी हजेरी लावली.
स्वागत व प्रास्ताविक दया वाकडे यांनी केले.आत्मभान कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन संतोष मिसाळ यांनी तर विलास गवळी यांनी आभार मानले.
हा समारंभ यशस्वी करण्यासाठी शिवशाही परिवाराचे अध्यक्ष माणिक गुंगे, विजय जाधव, सुनील चव्हाण शिवाजी गावकरे, नंदू चव्हाण, बालाजी गुंगे, समाधान गुंगे यांनी परिश्रम घेतले.