दूध अनुदान बंद करून ठोस दरवाढ द्या ; दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडू अशी आमदार आवताडे यांची ग्वाही

मंगळवेढा, दि.२६ : पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये दूध दराचा विषय लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलाच गाजल्यानंतर त्याचा फटका भाजप उमेदवाराला बसला होता त्यामुळे पंढरपूर मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी दूध संस्था चालक दूध उत्पादक यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी व अडीअडचणी जाणून घेण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शासनाचे मिळणारे अनुदान बंद करून ठोसपणे दूध दरवाढ करण्याची मागणी केली.  आमदार समाधान आवताडे यांनी दूध उत्पादकांच्या व संस्थाचालकांच्या मागण्या दुग्ध मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांसमोर दोन दिवसात मांडणार असल्याचे सांगितले.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील दूध उत्पादक शेतकरी व दूध संकलन करणाऱ्या दूध संस्था चालकांच्या अडीअडचणी बाबत लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, मंगळवेढा येथे आमदार समाधान आवताडे यांनी बैठक आयोजित केली होती.

यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, दामाजीचे शुगरचे माजी संचालक अशोक केदार, पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप खांडेकर,जिल्हा दुध संचालक तानाजी काकडे, सुरेश भाकरे,पप्पू काकेकर, येताळा भगत, पंढरपूरचे सुधाकर कवडे,अंकुश पडवळे, तानाजी काकडे,सुरेश भाकरे,सुधाकर कवडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की, दूध दराबाबाबत मी शासनाकडे गतवर्षीपासून वारंवार पत्रव्यवहार केला आहे त्यानुसार शासनाने 5 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते मात्र नियम अटीमुळे अनेक शेतकऱ्यांनी माहिती भरली नाही. अनेकांनी चुकीची माहिती भरली शेतकऱ्यांनी बरोबर भरली असली तर काही संस्थांनी चुकवली त्यामुळे अनेक दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यांनी नियम अटी पाहून आम्हाला अनुदानच नको अशीही भूमिका घेतली, दूध संघानीही सरकारवर अविश्वास दाखवत माहिती भरली नाही. त्या सर्व गोष्टींचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे तरी शेतकऱ्यांनी पोर्टलवर व्यवस्थित माहिती भरून ती माहिती त्या संस्थांनी पुढे पाठवली का नाही याची खात्री करावी. ज्यांनी अद्याप माहिती भरली नाही त्यांनी पोर्टल सुरू झाल्यानंतर माहिती भरावी सर्व शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असून वेळप्रसंगी मला सरकारशी भांडावे लागले तरीही मी तुम्हा शेतकऱ्यांसोबत असेल.

दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत माझे बोलणे झाले असून दूध उत्पादकांच्या अडचणी व समस्येबाबत या दोन दिवसात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार यांना भेटून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडीअडचणी त्यांच्यासमोर मांडणार आहे.
त्याच बरोबर खासगी दूध संस्थावर कुणाचेही निर्बंध नाहीत त्यामुळे त्यांचा मनमानी कारभार सुरू असून त्यांनाही सरकारच्या नियंत्रणात आणण्यासाठी येत्या अधिवेशनात आवाज उठवणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये यासाठी स्वतः मतदारसंघांमध्ये सर्व दूध संस्थाचालकांच्या सहकार्याने संघ उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही आमदार आवताडे यांनी जाहीर केले.

त्याच बरोबर ‘पंढरपुरी म्हैस’ पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे या म्हशीचा वंश जोपासणाऱ्या पंढरपूरच्या गवळी समाजाचा विचार करून त्या समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले.

सरकारने जनावरांचा विमा बंद केला तो पुन्हा सुरू करावा. दुधाच्या उत्पादन खर्चाएवढा सुद्धा दर शेतकऱ्यांना दर मिळत नाही, त्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला असून दराची हमी सरकारने दिली पाहिजे.
-आकाश डांगे, दूध उत्पादक

खासगी दूध डेअरी वाले सरकारचं ऐकत नाही. अनुदानासाठी त्यांनी डेटा सरकारकडे दिला नाही, त्यांचा मस्तवालपणा सरकारने जिरवणे गरजेचे आहे. अनुदान नको सरसकट दूध दरवाढ करा.
-देविदास इंगोले, चेअरमन दूध संस्था शिरशी

अनुदानाच देणं हा सरकारचा भिकरचोट धंदा आहे, तो त्यांनी बंद करावा व दरवाढीसाठी प्रयत्न करावेत.
-बाळासो यादव

५ ते ६ हजार पंढरपूरी जातीच्या म्हशी पंढरपूर शहरात संगोपित होत आहेत. एकही रुपयाची शासकीय मदत पंढरपुरी म्हशींसाठी मिळाली नाही. घरपोच म्हैस नेऊन प्रामाणिकपणे दूध देणाऱ्या पंढरपूच्या गवळी समाजाच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्यांच्याही समस्यांची दखल घ्यावी, कारण ते कोणत्याही संस्थेला दूध घालत नाहीत त्यामुळे त्यांची कुठेही नोंद नाही.
-राजकुमार शहापूरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here