सणावाराला खरेदी केलेले नविन कपडे अंगात घालून गल्लीभर फिरुन आल्याशिवाय बालपणी आपल्याला चैन पडत नव्हती. वय कितीही वाढले तरी नव्या कपड्यांची हौस काही आपली सरत नाही…… कपाटभर साड्या असल्या तरीही महिलांची साड्या खरेदीची आस कमी झाल्याचे कधी कुणी पाहिले नाही. शाळकरी मुलं तर उन्हाळा सुट्टीच्या अंतिम टप्प्यात शाळा सुरु व्हायची आतुरतेने वाट बघतात कारण काय ? तर शाळेच्या पहिल्या दिवशी नविन गणवेश मिळतो आणि नव्या पुस्तकांचा वास घ्यायला मिळतो हे खास कारण असते. ही ओढ त्यांना शाळेकडे आकर्षित करते हा सार्वत्रिक अनुभव आहे !
शाळा सुरु होऊन १० दिवस उलटले पण शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळाले नाहीत … एकवाक्यता यावी आणि समानतेची भावना वाढीस लागावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना गणवेशाचे बंधन असते. आज शाळेच्या मैदानावर रंगीबेरंगी फुलपाखरं बागडताना दिसत आहेत. सुट्टीत आजोळी ज्यांना नवे कपडे मिळाले अशी मुलं थाटांत मिरवताना दिसत आहेत तर ज्यांच्याकडे असे कपडे नाहीत अशी पोरं *गेल्यावर्षी शाळेत मिळालेला पण आता उसवलेला … फाटण्याच्या बेतात असलेला गणवेश परिधान करुन हिरमुसल्या तोंडाने शाळेत येत आहेत . अशा स्थितीत विद्यार्थी आणि खेडूत पालक गुरुजींना सवाल करीत आहेत , ” गुरुजी ….गुरुजी शाळेत गणवेश कधी येणार आहे ? ” या प्रश्नांची उत्तरे देताना शिक्षक मात्र बेजार झाले आहेत . सगळं काही माहिती असूनही हाताची घडी , तोंडावर बोट अशा स्थितीत पालकांचं समाधान होईल असं मोघम उत्तर देऊन वेळ मारुन न्यायची वेळ त्यांच्यावर आली आहे.
दरवर्षी गणवेशाचे दोन संच पुरविण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीकडे अनुदान उपलब्ध व्हायचे . ही योजना 2022 पर्यंत 100% मुलींसाठी व जात संवर्गातील मुलांसाठी होती. खुल्या प्रवर्गातील मुलांसाठी गणवेशाची तरतूद नव्हती अशा काळात देखील शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समित्या काटकसरीने खरेदी करुन सर्वांनाच गणवेश मिळतील असे नियोजन करीत असत कित्येक ठिकाणी पदरमोड देखील करावी लागायची . अनुदान खात्यावर जमा नसले तरीही उधार – ऊसणवार करुन का होईना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश उपलब्ध करुन देत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करीत असत. त्यामुळे शाळेचे रुटीन देखील लवकर लागायचे . यंदा मात्र कुणालाही गणवेश नाही आणि २५% विद्यार्थ्यांना नव्या पुस्तकांचा वास घ्यायची संधी अजूनही मिळाली नाही.
१७ फेब्रुवारी २०२३ रोजी वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या राज्य अधिवेशनात मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांनी १००% विद्यार्थ्यांसाठी गणवेश अनुदान उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आणि दीर्घकाळ पाठपुरावा सुरु असलेली मागणी शिक्षक समितीच्या व्यासपीठावरुन निकालात निघाली. मागील शैक्षणिक वर्षात या योजनेची अंमलबजावणी व्यवस्थित झाली. मात्र यावर्षी शासनाने गणवेश योजनेच्या अंमलबजावणीत अकारण बदल केल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याची शिक्षक समितीची धारणा आहे.
सन २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी गणवेश योजनेसाठी मार्गदर्शक सूचना निर्गत करण्यात आल्या आहेत. गणवेश कापडाचे मायक्रो कटिंग करुन आवश्यक संख्येने पुरवठा करण्याचे कंत्राट मे.पदमचंद मिलापचंद जैन यांना ४ मार्च २०२४ रोजी देण्यात आले आहे. संबंधित पुरवठादाराने कापडाचे बॉक्स प्रत्येक गट शिक्षणाधिकारी यांना पुरवायचे आहे.त्यांनतर लोक संचालित साधन केंद्रांतर्गत स्थानिक स्तरावरील महिला बचत गटाद्वारे गणवेशाची शिलाई करुन त्यांच्याकडून शाळांपर्यंत शिवलेल्या गणवेशाचा पुरवठा करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत महिला बचत गटाच्या कारागिरांनी शाळेस भेट देऊन संबंधित इयत्तेतील प्रत्येक विद्यार्थी/ विद्यार्थिनींची मापे घेऊन स्टँडर्ड मापांनुसार गणवेश शिलाई करुन शाळा स्तरावर उपलब्ध करुन द्यायचे आहेत. मात्र आजपर्यंत ही कार्यवाही झाली नाही. मात्र अद्यापपर्यंत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील एकाही शाळेत जाऊन शिलाईचे काम करणाऱ्या संस्थेच्या कारागिरांनी लाभार्थी विद्यार्थ्यांची मापे घेतलेली नाहीत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना योग्य मापाचे नियमित गणवेश कसे मिळतील..? अंदाजे मापे गृहीत धरुन गणवेश शिलाई केल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मापाचा गणवेश न मिळाल्यास पालकांच्या रोषाला स्थानिक शिक्षकांना सामोरे जावे लागेल हे कटू सत्य नाकारता येणार नाही .
शासनच्या पत्रानुसार स्काऊट गाईडच्या गणवेशासाठी सुद्धा कापड पुरविले जाईल व त्यासाठी प्रती गणवेश शिलाईसाठी १०० रुपये व अनुषंगिक खर्चासाठी प्रती गणवेश १० रुपये अनुदान शाळांना दिले जाणार आहे. कमी पट संख्येच्या शाळांतील विद्यार्थ्यांचे गणवेश एवढ्या कमी दराने कसे शिवून मिळणार ? हा प्रश्न तर आहेच पण कापड पुरवठा करण्याचा अट्टाहास नेमका कशासाठी ? हा निरुत्तर करणारा प्रश्न महाराष्ट्रात चर्चिला जातोय हे नक्की !
-श्री. सुरेश पवार,
भ्रमणध्वनी क्रमांक -7057475610
– लेखक हे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती , सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत.