आयुष्यभर तत्वाने वागणारे गुरुवर्य सि.बा.यादव सर म्हणजे कल्पतरूंचे झाड : ह.भ.प.जयंत महाराज बोधले महाराज

मंगळवेढा येथे गुरुवर्य सि.बा.यादव प्रतिष्ठानच्या सोहळ्यात गुणवंत शिक्षक व विद्यार्थी यांच्या सन्मान

मंगळवेढा, दि.१६ : गुरुवर्य सि.बा.यादव यांच्यामुळे जे विद्यार्थी घडले, त्यांचीच सरांच्या नावे या गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. आपण ज्यांच्यामुळे जीवनात यशस्वी झालो त्यांचे श्रेय त्या व्यक्तीला दिले जाते इतका मनाचा मोठेपणा या संतभूमीत पहावयास मिळतो. एखादा गुरु जीवनात काय करू शकतो हे गुरुवर्य सि.बा.यादव सर यांच्या विद्यार्थ्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. गुरु ही व्यक्ती नसते तर तत्व असते, आयुष्यभर तत्वनिष्ठेने वागणारे व ज्या झाडाच्या सावलीत बसल्यानंतर माणसाला काहीच कमी पडत नाही असे कल्पतरूंचे झाड गुरुवर्य सि.बा.यादव सर हे होत असे प्रतिपादन ह.भ.प.जयंत महाराज बोधले महाराज यांनी केले.

ते मंगळवेढा येथे गुरुवर्य सि.बा.यादव प्रतिष्ठानचा गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे हे होते. यावेळी व्यासपीठावर गुरूवर्य सि.बा.यादव, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, महा.जीवन प्राधिकरणचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता सुखदेव गरंडे, वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, सांगलीचे सेवानिवृत्त प्राध्यापक रघुनाथ नेने, श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर ट्रस्ट, मंगळवेढाचे अध्यक्ष अशोक कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

मंगळवेढा येथील शिक्षणाच्या क्षेत्रातील श्रध्देय नाव असेलेल सि.बा.यादव सरांच्या नावाने चालत असलेल्या या प्रतिष्ठांच्या कार्यक्रमाला यावं असं दोन-तीन वर्षापासून वाटत होते पण माझ्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मला आत्तापर्यंत येणे होत नव्हतं. पण यावर्षी या अत्यंत श्रद्धेय आणि उत्कृष्ट अशा उपक्रमाला उपस्थित राहत असताना मनस्वी आनंद होतो आहे. कारण ज्ञानाचं तेज काय असतं हे गुरूवर्य सि.बा.यादव यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येते असे नमूद करून ह.भ.प.जयंत महाराज बोधले महाराज पुढे म्हणाले, मंगळवेढा ही साधू-संतांची भूमी आहे. येथील सर्व संतांचा इतिहास या ठिकाणी आल्यावर लगेचच डोळ्यासमोर येतो. अनेक संतांचा अवतार आणि कार्य ज्या भूमीमध्ये झालं. या महान भुमीत यादव सरांसारखे रत्न जन्माला आले हेही या भुमीचेच भाग्य म्हणावे लागेल. आपल्या ओजस्वी आणि शिस्तप्रिय शिक्षणाने अनेक पिढ्या यशवंत बनवणारे सि.बा.यादव सर हे आदर्श व्यक्तिमत्व असून येणारा काळ नक्कीच यादव सरांच्या विचाराने प्रेरित असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा.शिवाजीराव काळुंगे म्हणाले की, आमची पिढी ही यादव सरांच्या हातखाली शिकली म्हणूनच आम्ही घडलो. त्यांच्या दिलेल्या संस्कार व शिस्तीच्या शिदोरीवर आज काहीतरी समाजहितासाठी करतो आहोत.आपल्या शैक्षणिक कार्यकाळात यादव सरांनी खुप मोलाची कामगिरी केली असल्याने समाजातील अनेक पिढ्या आज यशस्वीरित्या मार्गक्रमण करीत आहेत. याचे सर्व श्रेय यादव सर व त्यावेळच्या सगळ्या गुरूजनांचे आहे.

यावेळी तालुक्यातील प्रत्येक हायस्कूलमधून दहावी परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला तसेच शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करीत असल्याबद्दल ‘कृतिशील मुख्याध्यापक’ पुरस्कार- चिदानंद भिमण्णा माळी (महात्मा गांधी विद्यालय, वाघोली ता.मोहोळ), ‘गुणवंत शिक्षक पुरस्कार’ – मारुती नंदकुमार दवले (नगरपालिका कन्या शाळा नंबर १, मंगळवेढा), धनसिंग रेवू चव्हाण (जि. प. प्राथमिक शाळा, पटेल वस्ती, खुपसंगी), मनोज नायकवाडी (स्वा. से. कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय, पिंपळे-खालसा, हिवरे-कुंभार शिरुर, पुणे), काशिम अब्दुल पटेल (एम. पी. मानसिंगका विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सोडडी) यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डाॅ.भिमाशंकर बिराजदार यांनी व निवेदन ख्यातनाम कवी इंद्रजित घुले यांनी तर आभार नितीन मोरे यांनी मानले. डाॅ.शोभा पाटील तसेच सुरेखा साळुंखे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कार्यक्रमास धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन शोभाताई काळुंगे,जकराया शुगरचे चेअरमन ॲड.बी.बी.जाधव, निलाताई आटकळे, काँग्रेस कमीटीचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.नंदकुमार पवार, थोर इतिहास संशोधक व सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.आ.गो.पुजारी, श्रीधर भोसले,माजी शिक्षणाधिकारी ज्ञानदेव जावीर, मुझ्झपर काझी, किसन गवळी, पांडुरंग शुगरचे संचालक सुदाम मोरे, हजरत काझी, ॲड.रमेश जोशी, दत्तात्रय जमदाडे, सोलापूर जिल्हा शिक्षक सोसायटीचे संचालक राजेंद्र माळी, माणिक गुंगे, मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे, यातिराज वाकळे, पांडुरंग चौगुले, मुख्याध्यापक शंकर आवताडे, पत्रकार प्रमोद बिनवडे यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यश ग्रुप, शिवकुमार स्वामी, संतोष दुधाळ, बबन भोसले, रामचंद्र हेंबाडे, गणेश यादव, ॲड. बापूसाहेब यादव आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here