सोलापूर, दि.१६ : राज्यात शनिवारी सकाळ सत्रात शाळांची घंटा वाजली असली तरी राज्याच्या शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या अनेकविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी सोलापूर जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शनिवार दि. १५ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली. १५ मार्च २०२४ च्या संच मान्यतेचा शासन निर्णय मागे घ्यावा. समूह शाळा योजना, दत्तक शाळा योजना रद्द करावी, विद्यार्थी गणवेश धोरण पूर्ववत ठेवावे अशा मागण्या करण्यात आल्या. याशिवाय जिल्हा परिषद स्तरावरील प्रलंबित प्रश्नांबाबतही यावेळी ऊहापोह करण्यात आला. अशैक्षणिक कामे, माहिती संकलनाच्या नावाखाली आॕनलाईन , आॕफलाईन खर्डेघाशीची कामे यामुळे शैक्षणिक कामकाज प्रभावित होत असतानाच इ. १ ते ५ आणि ६ ते ८ वी च्या वर्गासाठी नव्याने लागू होणाऱ्या शासन निर्णयामुळे शिक्षक व मुख्याध्यापक पदे कमी होऊन त्याचा शैक्षणिक कामकाजावर तसेच गुणवत्ता वाढीवर प्रतिकूल परिणाम होणार आहे . त्यामुळे शासन व समाजाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याची भूमिका शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत यांनी मांडली.
या आंदोलनाला जिल्हा काँग्रेस कमिटीनचे कार्याध्यक्ष अॕड.नंदकुमार पवार यांनी भेट देऊन आंदोलनाला पक्षाच्या वतीने समर्थन दिले. यावेळी शिक्षणाधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर , मुख्यालय विस्ताराधिकारी हरीश राऊत, सुदर्शन राठोड यांनी भेट देऊन निवेदन स्विकारले. यावेळी शेख यांनी शिक्षक समितीची भूमिका शासन दरबारी पोहचविण्यात येईल व जिल्हा परिषद स्तरावरील प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याची ग्वाही दिली.
यावेळी शिक्षक नेते विकास उकीरडे , राज्य प्रसिद्धीप्रमुख डाॕ.रंगनाथ काकडे , जिल्हा सरचिटणीस शरद रुपनवर , कार्यकारी अध्यक्ष सुनिल कोरे, संतोष हुमनाबादकर , बसवराज गुरव , मो.बा. शेख , अमोघसिद्ध कोळी , अनिल बंडगर , बाबासाहेब माने, शंकर आजगोंडे , कैलास काशीद , भारत लवटे , विठ्ठल ताटे , अन्वर मकानदार , संजय पाटील , पतंगराव बाबर , शेखलाल शेख, किशोर बगाडे , दिनकर शिंदे , प्रसाद कुलकर्णी , रावसाहेब सुर्यवंशी , किशोर बगाडे , गजानन लिगाडे, किशोर गोडसे , राजाराम बनसोडे , पतंगराव बाबर , ज्ञानेश्वर गुंड, हणमंतराव पिसाळ , श्रीशैल हडलगी , उम्मीद सय्यद , मोहन बाबर , चंद्रकांत पवार , सचिन शिंदे , निंगप्पा बिराजदार , संजय ढेपे यांच्यासह शिक्षक समितीचे जिल्हा व तालुका शाखांतील शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.