मंगळवेढा, दि.15 : उत्तुंगतेज फाउंडेशन द्वारा घेण्यात येणाऱ्या उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेचा निकाल www.uysc.in या संकेतस्थळावर आज जाहीर झाला असून या परीक्षेत यश संपादन केल्याने मरवडे (ता.मंगळवेढा) येथील हनुमान विद्या मंदिर प्रशालेची विद्यार्थिनी धनश्री सुरेश शिंदे हीची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. या दौऱ्यासाठी उत्तुंगतेज बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या राज्यातील एकुण 65 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र राज्यातून एकूण 2300 विद्यार्थ्यांनी 28 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा दिली होती. गुणवत्ता यादीनुसार 300 विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली होती. 5 वी ते 7 वी या गटातून 150 व 8 वी ते 10 वी गटातून 150 विद्यार्थी निवडण्यात आले. ऑनलाईन पद्धतीने मुलाखतीतून 65 विद्यार्थ्यांची इस्रो ,आयआयटी, सायन्स सिटी येथे विज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. उत्तुंगतेज फाउंडेशन चे संस्थापक रामेश्वर हालगे हे बऱ्याच वर्षापासून विज्ञान क्षेत्रात विविध उपक्रम राबवून राज्यभर विज्ञान प्रसाराचे कार्य करत आहेत. इस्रो ,आयआयटी यांसारख्या उच्च संस्थांना भेट देऊन तेथील कार्यप्रणाली चा अभ्यास केल्यास विद्यार्थी तसे स्वप्न बघतील आणि ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांचा शास्त्रज्ञ होण्याकडे कल वाढावा असा उद्देश ठेवून याचे आयोजन केले जाते.
इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी धनश्री शिंदे हीची निवड झाल्याबद्दल तिचे मध्यविभाग सल्लागार समितीचे सदस्य तथा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष ॲड.नंदकुमार पवार, स्थानिक स्कूल कमेटी सदस्य बसप्पा येडसे, गोविंद चौधरी, माजी प्राचार्य साहेबराव पवार, माजी प्राचार्य संभाजी रोंगे, अंबादास पवार, प्राचार्य हणमंत वगरे, पर्यवेक्षक हणमंत केन्दुळे, सहशिक्षक आण्णासो जाधव, संजय मोरे, वर्गशिक्षक युवराज पाटील, मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती मंगल रोंगे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.