मंगळवेढा, दि.16: बदलत्या आधुनिक युगात सर्वांच्याच हातात पुस्तकाच्या जागी मोबाईल आले. मोबाईलमुळे घटकाभराची करमणूक होईल परंतु पुस्तके हीच जीवनाला आकार देणारी शिदोरी आहेत. वाचाल तरच वाचाल हे कटूसत्य हे विसरून चालणार नाही हे ध्यानी घेऊन मंगळवेढा येथील राकेश औदुंबर गायकवाड या पेशाने प्राथमिक शिक्षक असलेल्या वाचनवेड्या माणसाने आपले घरचं ‘ग्रंथविश्व’ बनवून गेली एकवीस वर्ष वाचन चळवळ निरंतर सुरू ठेवली आहे.
प्रत्येकात वाचनाची आवड निर्माण करणे ही अविरत चालणारी प्रक्रिया असली तरी गेली एकवीस वर्षे मंगळवेढा येथील प्राथमिक शिक्षक राकेश गायकवाड हे आपल्या स्वर्गीय संजय-सविता स्मृती सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जपण्याचे काम करीत आहेत. लहापणापासूनच वाचनाची आवड जपत असताना राकेश गायकवाड यांच्या भगिनी सविता व भाऊजी प्रा.संजय सातपुते यांचे 2000 या वर्षी अपघाती निधन झाले. वाचनावर नितांत प्रेम असणाऱ्या बहीण व भाऊजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ गायकवाड गुरुजींनी ठाणे येथील मामा बाळासाहेब नागणे यांच्या प्रेरणेने व जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष गुलाब पाटील, हजरत काझी, प्रा.शिवाजी काळुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली 2002 यावर्षी ग्रंथविश्व या वाचनयज्ञास सुरुवात केली.
राकेश गायकवाड यांनी अत्यंत कल्पकतेने बनविलेली ग्रंथविश्व ही इमारत पाहताक्षणी वाचकांचे लक्ष वेधून घेते. इमारतीच्या बिम, पिलर यांची पुस्तकाप्रमाणे रचना, त्यावर विविध प्रसिध्द पुस्तकांची नावे, वाचन संस्कृतीची ओळख करून देणारे प्रवेशव्दार हे सारं पाहिलं की आपली पाऊले आपसूकच या ग्रंथविश्वकडे वळतात. ग्रंथविश्वमध्ये सोळा हजार पुस्तके, दररोज सोळा वृत्तपत्रे, पन्नासहून अधिक मासिक व साप्ताहिके, बालवाचकांसाठी स्वतंत्र दालन, लेखनवर्गानुसार पुस्तकांची मांडणी, प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृह, विविध विषयांच्या कात्रणांचा संग्रह, परदेशी व भारतीय नाणी, पोस्टल तिकिटे यांचा संग्रह या साऱ्या गोष्टी प्रत्येकाची वाचन संस्कृतीशी नाळ घट्ट करतात. भिंतीवर विविध प्रबोधनात्मक विचार, शंभरहून अधिक साहित्यिक, थोर देशसेवक, समाजसेवक यांचे फोटो यामुळे आपल्याला प्रेरणा मिळाल्यावाचून राहत नाही.
शाळकरी मुले वाचनाकडे वळवी यासाठी दत्तक शाळा योजना, ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा, वर्षभर विविध प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन हे उपक्रमही याठिकाणी राबविले जातात. आजपावतो ग्रंथालय संघाचे राज्य संचालक दत्तात्रय क्षीरसागर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर, डॉ.गजानन कोटेवार, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, गंगाधर पडणे, सुमन शिंदे, प्रदीप मोरे, रवी कुलकर्णी, बंडा जोशी, आप्पासाहेब खोत, विश्वास पाटील, अरविंद पाटकर यांच्यासह हजारो लेखक, वाचक यांनी या वाचनालयाला भेट दिली असून या वाचन चळवळीचे कौतुक केले आहे.
तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रूपयांची भाकरी घ्या अन् एक रुपयाचं पुस्तक घ्या. भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल हे विचार आत्मसात करून राकेश गायकवाड यांनी शासनाच्या तुटपुंज्या अनुदानाची वाट न पाहता समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून वाचनयज्ञ अविरत सुरू आहे.