वेताळवस्ती शाळेची घडी बसवले नंतर माझी बदली 6 वर्षापूर्वी जि. प. प्राथ.शाळा गाडेवाडी या चिलवडी गावच्या भाग शाळेत झाली होती. खरं तर मला कोल्हापूरहून अहमदनगर जिल्ह्यात येऊन 3 वर्षाचा काळ लोटला होता. त्यामुळे मी थोडा स्थिरावलेला होतो. वेताळवस्ती शाळेपेक्षा गाडेवाडी ही अवघड क्षेत्रातील शाळा होती. इथल्या समस्या, अडचणी वेगळ्या होत्या. कोणत्याही नवीन शाळेत बदली झाली की, तेथील परिस्थितीचा अभ्यास करावा लागतो. प्रश्न समजून घ्यावे लागतात, मग त्यातून बाहेर कसे पडायचे ? यावर विचार करावा लागतो, रणनिती आखावी लागते, पाठपुरावा करावा लागतो, लोकांना सोबत घ्यावे लागते आणि नंतर शेवटी यश मिळते.
माझ्या गाडेवाडी शाळेच्या इमारतीची उत्तरेकडे तोंड करून उभी असलेली 1 खोली 1958 साली बांधलेली होती. सुमारे 60 वर्षापूर्वीची ती सागवानी लाकडाची इमारत ! यातील डोक्यावरची लाकडी कैची कुजलेली,पत्र्यांना छिद्रे पडलेली, भिंतीची कुंभी पाणी मुरत असलेने फुगलेली दिसत होती. तरीही इमारत ऊन, पाऊस,वादळवाऱ्याला धीराने तोंड देत उभी होती. पाऊस आला की इमारत गळायची.आम्हाला पावसाळ्यात भिती वाटायची, वारं सुटलं की थोडं असुरक्षित वाटत राहायचं.तसं पाहिलं तर खोलीची साधी शहाबादी फरशी जरा बरी होती, कुठेतरी कडा कोपऱ्यात उखडलेली दिसत होती एवढंच ! मात्र व्हरांड्यातील फरशी जागोजागी खराब झाली होती. ही कहाणी झाली एका खोलीची तर दुसरीची अवस्था हिच्यापेक्षा जास्त वेगळी नव्हती.
दुसरी खोली अगदी पहिल्या खोलीच्या विरुद्ध बाजूला समोरासमोर म्हणजे अगदी दक्षिणमुखी ! तसं पाहिलं तर गावकरी सांगतात की तिचे वय फार नव्हते तर सुमारे 20 – 25 वर्षाचे असावे, तरीही छताचे पत्रे गळके आणि गंजलेले, कैचीच्या लोखंडी पाईप तांबेरलेल्या दिसत होत्या. व्हरांड्यातील खांब मात्र ताठ मानेने आपला स्वाभिमान राखून उभे होते. पण छताच्या पाईप पाण्यामुळे सडलेल्या, गंजलेल्या दिसत होत्या. आतील बाहेरील फरशी खराब दिसत होती. या सगळ्यात समाधानाची बाब म्हणजे शाळा रंगविलेली असलेने तिचे वय तेवढे दिसत नव्हते. प्रथम दर्शनी बाहेरून पाहिले तर रुपडे बरे दिसत होते पण प्रत्यक्षात आतून सगळी परिस्थिती अशी बिकट होत चाललेली होती. तरीही दोन्ही इमारती एकमेकींना आधार देत उभ्या होत्या.
समोरच्या मोकळ्या जागेत फरशी टाकलेली, पण फरशीला दर्जा (सिमेंट) भरण्याची आवश्यकता होती. तसेच रॅम्प वर लहान खड्डे पडलेले दिसत होते, ते आम्ही सिमेंट वाळूने अनेकदा बुजवले पण ते पॅच काम तेवढ्या पुरते समाधान देऊन जायचे. नंतर दुसरीकडे पुन्हा तशीच परिस्थिती उद्भवयाची. त्यावर काँक्रीट टाकणे निकडीचे होते. शाळेचे किचनशेड मात्र टकाटक होते. स्वच्छतागृहांचे दरवाजे खराब झालेले होते. शाळा खोल्यांच्या खिडक्यांची दुरुस्ती करून घेणे गरजेचे होते, कड्याही आतून नीट बसत नव्हत्या.
माझ्याकडे शाळेचा चार्ज होता, तर माझे सहकारी शिक्षक होते श्री. संतोष परदेशी सर. तसं पाहिलं तर सर या शाळेत माझ्यानंतर तीन आठवड्यांनी आंतरजिल्हा बदलीने परभणीहून स्वजिल्ह्यात हजर झालेले होते. आम्ही दोघेही इथे नवीनच होतो. मी माझ्या सवयी प्रमाणे अभ्यास सुरु केला, पहिल्यांदा सध्या आपल्या बजेट मध्ये काय आहे ? गरजा लक्षात घेऊन त्यांचा क्रम लावला. निकडीच्या गोष्टी सुरुवातीला करायच्या ठरवले. खरोखरंच एका मिशनची मनोमन सुरुवात झाली, या शाळेचे रुपडे पालटायचे ठरवले. प्रवास कितीही खडतर असला तरी मागे हटायचे नाही. अनंत अडचणी येणार आहेत याची कल्पना होतीच. किती ही त्रास झाला तरी मिशन पूर्ण करायचीच आहे. यावर मी ठाम होतो. हे काम पूर्ण केलेशिवाय या शाळेतून बदली मागायची नाही. मिशन पूर्ण करूनच समाधानाने / भरल्या मनानेच शाळेला निरोप द्यायचे ठरवले. मी इथे यायच्या अगोदर 60 वर्षात किती तरी मुख्याध्यापक होऊन गेले असतील, माझ्या नंतर ही होणार आहेत. त्यांनीही खूप प्रयत्न केले असतील. पण इप्सित ध्येय त्यांना गाठता आले नसेल, त्यांचे प्रयत्न ग्राह्य धरुन आपण मिशन पूर्ण करणारच हा आत्मविश्वास मनात होता. आपले ध्येय / स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ते सत्यात उतरवण्यासाठी लागणारे कष्ट, चिकाटी, सकारात्मकता, पाठपुरावा करण्यासाठी उत्साही मन ह्या माझ्या जमेच्या बाजू मी जाणून होतो. झालं ठरलं तर मग ! ….त्यानुसार प्रथमतः खिडक्या व दरवाजे यांची दुरुस्ती करून घेतली. त्यानंतर स्वच्छतागृहांना लोखंडी फ्रेमचे दरवाजे बनवून ते बसवून घेतले, त्यांना कुलपे लागल्याने शाळेच्या वेळेनंतर त्याचा वापर करणारांची प्रथम गैरसोय झाली. शाळेसाठीच त्याचा वापर सुरु झाल्याने स्वच्छता राहू लागली. रॅम्पची डागडुजी मात्र आम्हास सारखी करावी लागतच होती.
पहिल्या दोन वर्षी शाळेचा निर्लेखन प्रस्ताव जि.प. अहमदनगरकडे सादर केला. पण तो नामंजूर झाला तसेच त्यांचे मला एक पत्र आले की तुमच्या शाळेची इमारत चांगली आहे, त्यामुळे पुन्हा निर्लेखन प्रस्ताव इकडे पाठवू नये. त्यामुळे एक मार्ग कायमचा बंद झाला. त्यांची ही चूक नव्हती, रंगकामामुळे शाळा नवीनच दिसत होती ना ! मी तालुक्याच्या इंजिनीयर साहेबांची भेट घेतली, ते शाळा पाहायला आले. त्यांनी मला मोठी दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. 2 वर्षे पुन्हा प्रस्ताव सादर करत होतो, पण यश काही गवसत नव्हते. आमचे जि. प. सदस्य अहमदनगर नियोजन मंडळाचे सदस्य होते. त्यांच्याकडून ही सतत पाठपुरावा सुरुच होता, त्यांच्या प्रयत्नातून चिलवडी गावच्या शाळेसाठी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला पण आम्ही गाडेवाडीकर मात्र पुन्हा उपाशीच राहिलो. शिक्षणाधिकारी साहेब पुढील वर्षी पाहू म्हणालेत असा त्यांचेकडून निरोप आला. त्याचवेळी माझे पंचायत समिती स्तरावर व ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे मार्फतही प्रयत्न सुरुच होते. 30 च्या आत शाळेचा पट असलेने मला एक अडथळा नेहमी येत होता. स्पर्धेत आम्ही त्यामुळे मागे पडत होतो. पदाधिकारी – अधिकारी सर्वासोबत माझा पाठपुरावा व संपर्क सुरु होता, सर्व मार्गाने लढत होतो, पण यश काही मिळत नव्हते. तरीही मी प्रयत्नवादी असलेने सकारात्मक होतो. 4 वर्षे प्रयत्न करूनही अपयश वाट्याला येत होते, पण मी हरलोलो नव्हतो. कारण जिंकण्यापर्यंत लढण्याची जिद्द मनात होती. अथक प्रयत्न करणेच आपले हाती असते. ते काम मात्र मी निष्ठेने करत राहिलो. यात कोरोनाची ही 2 वर्षे समाविष्ट होती, त्यामुळे ही निधीची उपलब्धता होत नसावी.त्यातच महाराष्ट्रात सरकार 2 वेळा बदललेले होते. अडचणी वाढत होत्या, प्रश्नाचा गुंता मात्र जसाच्या तसा होता. कितीही अडचणी आल्या तरी मी मात्र प्रचंड आशावादी होतो. हाच आशावाद 5 व्या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये फळाला आला. माझ्या शाळेच्या दृष्टीने तो सोन्याचा दिवस उजाडला होता ! ज्या दिवसाची चातक पक्ष्याप्रमाणे आम्ही आस लावून बसलेलो होतो. जि.प. कडून मोठी दुरुस्ती मंजूर होऊन 2 लाख 50 हजार रुपये निधी मिळणार असल्याची बातमी मिळाली. आमचा आनंद गगनात मावेनासा झाला होता !
प्रतिक्षा एकदाची संपली होती. त्यानंतर वर्क ऑर्डर निघून प्रत्यक्ष काम सुरु व्हायला ऑगस्ट महिना उजाडला. एवढ्या रकमेत 2 खोल्यांचे काम पूर्ण करणे शक्य होणार नाही, आपण एका खोलीचे पूर्ण काम करूयात असा सूर निघायला लागला,आम्ही मात्र 2 खोल्यांचेच काम पूर्ण करण्याचा आग्रह कायम ठेवला. कारण एवढा निधी मिळवायला आम्हाला 5 वर्षे गेलेली होती. नंतर निधी कधी मिळेल याची शाश्वती नव्हती. रक्कम कमी पडत असल्यास चिलवडी ग्रामपंचायतने वित्त आयोगातून 50 हजार रुपये देण्याचे कबूल केले व शेवटी तिढा सुटला.
या रकमेतून 2 खोल्यांसाठी TATA शक्तीचा पत्रा वापरण्यात आला असून लोखंडी 2 मजबूत कैच्या बनवण्यात आल्या आहेत. तसेच 2 ही खोल्या मध्ये व बाहेर व्हरांड्यात स्टाईल्स बसवण्यात आल्या. त्याच प्रमाणे मधल्या पॅसेज मधील फरशीला दर्जा भरण्यात आल्या. त्याच प्रमाणे रॅम्प वर काँक्रीट टाकण्यात आाले. सर्व किरकोळ कामे लक्ष देऊन पूर्ण करण्यात आली. अशा प्रकारे उत्कृष्टरीत्या सर्व मोठ्या दुरुस्तीचे काम झाले,पण रंगकाम करण्यास मात्र पैसा उरला नाही. तो पर्यंत आमचे वर्ग आम्ही मंदीरात भरवले. त्याच दरम्यान मा. न्यायधीश साहेब यांची कमिटी ही शाळेस भेट देऊन गेली. सर्वांनी समाधान व्यक्त केले. खूप बरे वाटले.
एवढे सगळे करूनही रंगकाम राहिल्याने मनात एका कोपऱ्यात अस्वस्थता मात्र कायम होती. त्यामुळे 26 जानेवारी 2024 ला प्रजासत्ताक दिनी सर्वासमोर लोकसहभागातून रंगकामाचा प्रस्ताव ठेवला. लोकांनीही आमची धडपड पाहिली होती, ते सगळे याकामी आमचे सोबत होते. त्यांनी लगेच प्रस्ताव स्विकारला, त्याच दिवशी 6 हजार रुपये निधी जमा झाला व 13 हजार निधीची घोषणा झाली. महिना भरात 22 हजाराचा निधी जमला, त्यात मी आणि माझे सध्याचे सहकारी श्री. अश्रूबा गोयकर सर यांनीही निधीचा सहभाग घेतला. आपला हेतू चांगला असला,काम प्रामाणिक व पारदर्शक असले की अनेक हात मदतीस धावून येतात, याचा अनुभव आम्ही घेतला. 2024 च्या मार्च महिन्यात सर्व 2 खोल्या, स्वच्छतागृहे, किचनशेड व वॉल कंपाऊंडचे रंगकाम पूर्ण केले आणि 6 वर्षापूर्वी हाती घेतलेले मिशन पूर्ण झाल्याचा आनंद व समाधान अवर्णनीय आहे. आता कधीही बदली झाली तरी मी आनंदाने शाळेचा निरोप घेईन. कारण शाळेचा एक खूप मोठा अनेक वर्ष रखडलेला प्रश्न मार्गी लागला. त्याकामी सर्व शिक्षण विभागातील अधिकारी, पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती, गाडेवाडीचे पालक, ग्रामस्थ व चिलवडी ग्रामपंचायतचे पाठबळ आम्हाला मिळाले. या सर्वांचे आभार मानणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा हा पल्ला गाठणे सोपे नव्हते. याकामी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत केलेल्या सर्व अनमोल हातांचे पुनश्च शतशः अभिनंदन आणि आभार !
आता मन हलके झालेसारखे वाटते आहे. मनातील भावना शब्द रुपाने उतरल्या आणि नव्या उमेदीने नवीन प्रश्नांना भिडण्यास मन पुन्हा तयार झाल्यासारखे वाटते आहे. काही उणीवाही कळवा म्हणजे विद्यार्थी म्हणून शिकण्याची माझी भूक कायम राहील !
आजपासून सुरु होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
– आपलाच शिक्षक मित्र,
श्री.मकरंद सयाप्पा गडदे, मुख्याध्यापक,जि.प.प्राथ.शाळा गाडेवाडी (चिलवडी), केंद्र – राशीन, ता. कर्जत, जि. अहमदनगर.
मो.8275506386
श्री.मकरंद सयाप्पा गडदे हे मंगळवेढा तालुक्यातील कचारेवाडी गावचे आहेत.