मंगळवेढा, दि.१४ : जवाहरलाल हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक गुरुवर्य सिद्राम बापू यादव यांच्या गौरवार्थ स्थापन केलेल्या सि. बा. यादव प्रतिष्ठान, मंगळवेढा यांच्यावतीने सन २०१७ पासून मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक हायस्कूलमधून एस. एस. सी. परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र व रोख रकमेचे पारितोषिक देऊन गुणगौरव करण्यात येतो. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षकांना प्रतिष्ठानच्यावतीने पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. यंदा हा विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवार दिनांक १६ जून, २०२४ रोजी सकाळी १० वाजता लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
हा सोहळा ह. भ. प. डॉ. जयवंत महाराज बोधले (धामणगावकर) यांच्या शुभहस्ते व शिवाजीराव काळुंगे (संस्थापक, धनश्री परिवार) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून सुखदेव गरंडे (सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता, महा. जीवन प्राधिकरण), ज्ञानोबा फुगारे (माजी मुख्याध्यापक, जवाहरलाल हायस्कूल, मंगळवेढा), रघुनाथ नेने (सेवानिवृत्त प्राध्यापक, वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज, सांगली), अशोक कोळी (अध्यक्ष, श्री रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर ट्रस्ट, मंगळवेढा) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
यंदाच्या ‘सि.बा.यादव प्रतिष्ठानच्या ‘कृतिशील मुख्याध्यापक’ पुरस्कारासाठी’ चिदानंद भिमण्णा माळी (महात्मा गांधी विद्यालय, वाघोली ता.मोहोळ), ‘गुणवंत शिक्षक पुरस्कारा’ साठी मारुती नंदकुमार दवले (नगरपालिका कन्या शाळा नंबर १, मंगळवेढा), धनसिंग रेवू चव्हाण (जि. प. प्राथमिक शाळा, पटेल वस्ती, खुपसंगी), मनोज नायकवाडी (स्वा. से. कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय, पिंपळे-खालसा, हिवरे-कुंभार शिरुर, पुणे), काशिम अब्दुल पटेल (एम. पी. मानसिंगका विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सोडडी) यांची निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमास माजी विद्यार्थी तसेच शिक्षक बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.