मंगळवेढा, दि.१३ : जीवनात शैक्षणिक गुणांची कमाई जरूर केली पाहिजे परंतु त्याबरोबर जीवनात उन्नतीची मौलिक तत्वेसुद्धा आपण आत्मसात केली तर एक यशस्वी माणूस म्हणून आपण नक्कीच जीवनामध्ये आपले व्यक्तिमत्व घडवू शकणार आहे. त्यामुळे पराक्रम सिद्ध करण्याच्या कालखंडात कोणत्याही मोहाला बळी न पडता आपल्या ध्येयांवर आणि स्वप्नांवर लक्ष केंद्रित करून अपेक्षित यशाला गवसणी घालणे गरजेचे असल्याचे मत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.
स्व.महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेतील गुणवंतांचा गुणगौरव सोहळा जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करत असताना ते बोलत होते. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते ३१० गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी बोलताना संस्कार आणि गुणवत्ता पूरक शिक्षण घेऊन जीवनाच्या प्रवासात यशाची अनेक शिखरे गाठा परंतु ही उंची गाठताना आपल्या आई-वडीलांना आणि त्यांच्या संस्कारांना कधीही अंतर देऊ नका असा मार्मिक सल्ला सुप्रसिद्ध प्रवचनकार तथा माजी सनदी अधिकारी डॉ. इंद्रजीत देशमुख यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी अनेक प्रेरक आणि यशस्वी व्यक्तिमत्त्वांची संघर्ष गाथा सांगून त्यांच्या यशस्वी जीवनाचे रहस्य उलगडले आहे.
यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय आवताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रांत गायकवाड, पंचायत समिती गटविकास अधिकारी योगेश कदम, नगरपरिषद मुख्याधिकारी चरण कोल्हे, पोलीस निरीक्षक रणजीत माने, नायब तहसीलदार श्रीमती स्वामी, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी डॉ. बिभिषण रणदिवे, माजी मुख्याध्यापक दत्तात्रय जमदाडे, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, यशोदा पतसंस्थेच्या चेअरमन नीलाताई आटकळे, जिल्हा लेबर फेडरेशन संचालक शाम पवार, माजी संचालक सुरेश भाकरे, राजीव बाबर, प्राथमिक शिक्षक महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती कलुबर्मे, संचालक अशोक केदार, जगन्नाथ रेवे, माजी सरपंच गणेश गावकरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षक भीमाशंकर तोडकरी यांनी मांडताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून या प्रतिष्ठानच्या अंतर्गत मतदार संघामध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकीचा नवा दीपस्तंभ निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दादासाहेब ओमणे, सचिव सरोज काझी, संचालक कैलास कोळी, संजय माळी, बापूराव काकेकर तसेच मंगळवेढा तालुक्यातील विविध शाळांचे संस्थाध्यक्ष, प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक नेते संजय चेळेकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.