स्व. लालसिंग रजपूत सर यांचा चौथा पुण्यस्मरण सोहळा विशेष…
दुःखाच्या वाटेवर
गाव तुमचे लागले,
थबकले न पाय तरी
ह्दय मात्र थांबले !
वेशीपाशी उदास
हाक तुमची भेटली,
अन माझी पायपीट
डोळ्यातून सांडली…(सुरेश भट)
आयुष्यात असे काही प्रसंग आले की माझी देवापेक्षा माणसातल्या देवांवर श्रध्दा वाढु लागली. लहानपणापासून पोरकंपणाचं दुःख भोगत असताना वेळोवेळी अशी काही चांगली माणसं भेटत गेली की त्यांनी मला आपुलकीची वागणूक देत जीवनाची दिशा दिली. त्यापैकीच एक देवमाणूस म्हणजे स्व.लालसिंगजी रजपूत सर होय.
सोलापूरचे उपमहापौर, महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संघटनेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हौसिंग फायनान्सचे अध्यक्ष, श्री बालाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, मागास समाज सेवा मंडळाचे उपाध्यक्ष, बालाजी पतसंस्थेचे अध्यक्ष अशी सारी मोठी पदे असूनही समोरच्या लहान माणसांना हा मोठा माणूस नेहमीच आपला वाटला. माणूस आपला वाटतो म्हणजे काय असतं हो… एखाद्याचे काम चांगले वाटू लागले म्हणजे तो माणूस आपला वाटू लागतो. एखाद्या व्यक्तीचे पद गेले की त्याची कशी अवस्था होते, हे सारं डोळ्यासमोर घडताना आपण नेहमीच पाहतो. पदाच्या पलीकडे जाऊन लालसिंग सरांनी माणसं जोडण्याचे काम केले. त्यांची सारी पदे त्यांच्यासाठी कधीच महत्वाची नव्हती. झपाटून जाऊन काम करायचं आणि साऱ्यांचे आधारवड व्हायचे ही विचारांची शिदोरी त्यांच्याजवळ होती.
जीथे दिवसा जायलाही भीती वाटेल, असे ओसाड माळरान असलेल्या लमाणतांड्याचे रूपांतर आज गावात झालं आहे. सहा महिने सुगी, ऊसतोड या कामासाठी गावाबाहेर मोलमजुरी व सहा महिने लमाणतांड्यावरचे- जगायचं आहे म्हणून चाललेलं जगणं. आभाळाच्या सावलीखाली, कुडाच्या ओसरीला चाललेलं समाजबांधवांचे दुःखी जीणं लालसिंग सरांना गप्प बसू देणारं नव्हतं. गावासाठी, समाजबांधवांसाठी कासा योजनेअंतर्गत कामास सुरवात करून लमाणतांड्यावरील लोकांना रोजगार मिळवून देत स्थिर करण्याचा प्रयत्न केला. हौसिंग फायनान्सच्या माध्यमातून चांगली घरे बांधून दिली. ‘आभाळच माझे छप्पर, या छप्पराखालीच जगू आणि मरूही’ असं म्हणणाऱ्या लमाण समाजाला या मायेच्या माणसांमुळे आपलं हक्काचे घर मिळालं. लमाणतांड्याचे ग्रामपंचायतीमध्ये रूपांतर करण्यासाठी शासनदरबारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत ‘बालाजीनगर’ नावाचे गाव साकारले. सतत ३५ वर्षे बिनविरोध ग्रामपंचायत पदाधिकारी निवड, केवळ महिला पदाधिकारी मंडळींची ग्रामपंचायत, विविध प्रकारचे पुरस्कारप्राप्त अशी ग्रामपंचायत असा या ग्रामपंचायतीचा लौकिक आहे, हे केवळ लालसिंग रजपूत यांच्यामुळेच. माणूसाने फक्त स्वतः चांगले असून चालत नाही तर त्यांना जीवनात कोणाचे मार्गदर्शन/सोबत आहे, यावर सारं काही अवलंबून असते. लालसिंग सरांनाही माजी मंत्री कमळे गुरुजी, दलितमित्र चंद्राम चव्हाण गुरुजी, राम पवार, गोपाळ राठोड अशी माणसं सुरुवातीच्या काळात भेटली. याच काळात त्यांच्या कामातील धडपडीमुळे सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर या पदावरही त्यांना संधी मिळाली. उपमहापौर पद सांभाळत असताना आपल्या कामाचा ठसा उमटवला.
माणूस शिकला तरच तो जगात स्वाभिमानाने जगू शकेल हे ध्यानी घेऊन पाठीवर मुळाक्षरे गिरविण्यासाठी ज्या समाजाला शेकडो वर्षांची वाट पाहावी लागत आहे त्या समाजासाठी लमाणतांड्यावर शिक्षणाची गंगा आणली. आज बालाजीनगर येथे प्राथमिक शिक्षणापासून उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय करण्यात आली असून या शिक्षणसंकुलात पंधराशेहून अधिक विद्यार्थी जीवनाचे धडे घेत आहेत. आपल्या शिक्षणसंकुलात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या पाहिजेत ही भावना उराशी बाळगत विद्यार्थ्यांना विविध सोयी-सुविधा पुरविण्याबरोबर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळोवेळी प्रबोधनात्मक शिबीर घेऊन जगाबरोबर चालण्यासाठी मार्गदर्शन करत होते. वाचाल तरच वाचाल, झाडे लावा व जगवा हा मंत्र ते नेहमीच विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना देत.
महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना, आश्रमशाळा म्हटलं की नाक मुरडणाऱ्या अनेकांना या आश्रमशाळा म्हणजेच भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मुलांसाठी जीवनाची शिडी आहे हे दाखवून दिले. सर्वांना एकाच मापात तोलू नका तर जे चांगले आहे त्यांना चांगलेच म्हणा असे शासनदरबारी ठासून सांगत आश्रमशाळांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. ‘मला रिटायर व्हायचं आहे’ असे आपल्या सहकारी मंडळींना ते नेहमी म्हणत परंतु आश्रमशाळा बाबतची आंतरिक तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. अगदी शेवटच्या श्वासापर्यत ते ‘माझा गाव, आश्रमशाळा, आश्रमशाळेतील मुले, शाळेचा परिसर हे माझे तीर्थक्षेत्र आहे, हे तीर्थक्षेत्र नेहमी पवित्र ठेवा’ असे सांगत. आज लालसिंग सरांनी आश्रमशाळा परिसरातील जोपासलेली पाच हजार झाडे त्यांच्या खऱ्या अर्थाने जगण्याची साक्ष देतात.
२००३ साली एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माझी व सरांची ओळख झाली. स्वतःपेक्षा पुढे काहीच दिसत नाही अशा माणसांची गर्दी असताना, समाजासाठी झटणारा हा माणूस वेगळा वाटला अन त्यांची व माझी अशी एका वेगळ्याच नात्याची घट्ट वीण झाली, पुढे दोन वर्षे वेळोवेळी संपर्क होत होताच. एका पत्रकार मित्राकरवी माझी माहिती काढून आजोबाच्या घरी येत ‘मल्हार गुरुजींचा नातू’ म्हणून मला संस्थेत नोकरीला घेतो म्हणून शब्द दिला. मोहोळला (कै.) डी. व्ही.गायकवाड मामा यांच्या संस्थेत नोकरीला जाण्याच्या तयारीत असताना मोहोळचा रस्ता सोडत बालाजीनगरमध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला आणी २००६ साली त्याच्या संस्थेत रुजू झालो. गेल्या अठरा वर्षांच्या काळात नेहमीच आपलेपणाची वागणूक मिळत गेली. बालाजीनगर गेस्ट हाऊसला लालसिंग सर आले की हमखास बोलावण असायचं, चर्चा करत असताना स्वतःवर बरीच संकट असताना आश्रमशाळेचाच विचार करणारा हा माणसातला देवमाणूसच अधिकच जवळचा वाटायचा. कोणताही माणूस कामाने मोठा असतो असे ते नेहमी म्हणत ते नेहमी गुणिजनांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करायचे. माझी मुलगी कु.श्रुतिका हिचा पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजतगाजत मिरवणूक काढून केलेला सत्कार असो किंवा माझी मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी झालेली निवड, आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल दिलेली कौतुकाची थाप असो या गोष्टी कधीच विसरल्या जाऊ शकणार नाहीत.
काही महिन्यांपूर्वी त्यांच्याच प्रेरणेने सुरू करण्यात आलेल्या झेप परिवाराची माहिती सांगताना सरांना खूप आनंद झाला. झेपच्या विविध उपक्रमाचे कौतुक करत त्यांनी आजारी असतानाही झेप परिवाराच्या वर्धापनदिनानिमित्ताने हजेरी लावत पुढे वेळोवेळी झेप परिवाराने अशीच झेप घ्यावी असे आशीर्वादही दिले. भविष्यात याच संस्थेला त्यांच्यासारख्याच कर्तृत्ववान व्यक्ती व संस्थेला लालसिंग रजपूत व्यक्ती नव्हे चळवळ पुरस्कार देऊन त्यांची आठवण चिरंतन ठेवावी लागेल हे त्यावेळी ध्यानीमनीही नव्हतं.
गेले दोन महिने लालसिंग सरांवर पुणे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात फोनवर बोलणे झाले- प्रकृतीची विचारपूस करत असताना, मी १० एप्रिल २०२० पर्यंत बालाजीनगर येथे येतो आहे आपण भेटू व बोलू असा संवाद झाला. सरांची वाट पाहत असताना सर मात्र मृत्यूशी झुंज देत आहेत हे कधी जाणवलंच नाही. फोनवर संपर्क केल्यानंतर सरांवर उपचार सुरू आहेत, लवकरच ते बरे होतील असा निरोप असायचा. परंतु गेल्या शुक्रवारी (दि.२२ मे २०२०) सरांची प्रकृती चिंताजनक आहे या बातमीने अस्वस्थता वाढली. शनिवार (दि.२३ मे २०२०) रोजी सायंकाळी सरांचे दुःखद निधन झाल्याचा निरोप आला आणि मी आयुष्यात पुन्हा एकदा पोरका झालो.
एकादी व्यक्तीचे असे अकाली जाण हे सर्वांसाठीच दुःखदायक असतं. पुनर्जन्म होतो की नाही याबाबत काही सांगता येत नसले तरी देवमाणूस लालसिंग रजपूत यांनी ज्या कारणासाठी आपले आयुष्य वेचले ते विचार तरी कायमस्वरूपी जिवंत राहतील यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. भविष्यात त्यांच्याच नावाने स्व.लालसिंग चिंगुसिंग रजपूत प्राथमिक/ माध्यमिक आश्रमशाळा, कला व कनिष्ठ महाविद्यालय, बालाजीनगर असे नामकरण होत असताना या शाळांमधून लालसिंग सर यांना अभिप्रेत असलेले शिक्षण दिले गेले तरच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.
स्व. लालसिंग रजपूत सर यांचा चौथा पुण्यस्मरण सोहळा आज होत आहे त्यानिमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !
देवमाणसाच्या सत्काराचा योग- गुणिजनांचा सन्मान करत त्याच्या पाठीवर कौतुकच थाप टाकून प्रोत्साहन देण्याचे काम लालसिंग रजपूत सर यांनी नेहमीच केले. या देवमाणसाच्या सत्काराचा योग झेप सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने जुळून आला होता.
– श्रीकांत मेलगे, मरवडे, ९४२१०६४११०