सोलापूर, दि.०३: सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून शिक्षक व विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या तालुक्यात निवडणूक कर्तव्य आदेश देण्यात आलेले आहेत . त्यांच्या प्रवासामध्ये सुलभता यावी यादृष्टीने अंतराची अट न ठेवता बस सेवा पूर्ववत उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
शिक्षक तसेच विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना दुसऱ्या प्रशिक्षणासाठी नेमून दिलेल्या तहसिलमध्ये उपस्थित राहताना कर्मचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. वेळेवर उपस्थित राहण्यासाठी निकड , उन्हाची तीव्रता , अपुरी वाहतूक साधने यामुळे कित्येक कर्मचाऱ्यांची तारांबळ उडालेली होती.
त्यामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या अदल्या दिवशी निवडणूक कर्मचाऱ्यांना अन्य तालुक्यात निवडणूक कर्तव्यावर जावे लागणार आहे. किमान अंतराची मर्यादा ठरवून लगतच्या तालुक्यात कर्मचाऱ्यांनी स्वतः प्रवासाची सोय बघून उपस्थित राहण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर ज्या ठिकाणी बससेवा उपलब्ध करुन दिलेली आहे तेथील कर्मचाऱ्यांना देखील वाहतूक भाडे देऊन प्रवास करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची दि.६ मे रोजी संबंधित तहसिलला वेळेवर उपस्थित राहणे व मतदानानंतर मतदान साहित्य जमा करुन ७ तारखेला रात्री उशिरा आपल्या गावी परतताना होणारी हेळसांड विचारात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतूक भत्त्याची तरतूद करण्यात आलेली असली तरीही अंतराची मर्यादा न ठेवता सर्व तालुक्यासाठी बस सुविधा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
प्रत्येक भारतीय मतदार नागरिकांसाठी निवडणूक यंत्रणेकडून चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र ही यंत्रणा राबविणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील दिलासा मिळेल यादृष्टीने सहानुभूतीपूर्वक विचार करुन नेमणूक दिलेल्या प्रत्येक तहसिल पर्यंतच्या वाहतूकीसाठी एस.टी.सुविधा उपलब्ध व्हावी यादृष्टीने नियोजन करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर शिक्षक समितीचे पदाधिकारी सुरेश पवार , शरद रुपनवर, सुनिल कोरे, संतोष हुमनाबादकर , मो.बा.शेख , अन्वर मकानदार यांच्या स्वाक्षरी आहेत .