मंगळवेढा, दि.१३: साहित्य, संशोधन, पर्यटन, पुरातत्त्व, धार्मिक क्षेत्राला ‘दर्शनमात्रे’ च्या रूपाने अतिशय मोलाचा दस्ताऐवज मंगळवेढा येथील लेखिका भारती धनवे यानी उपलब्ध करुन दिला आहे. दर्शनमात्रे हे फक्त पुस्तक नव्हे तर मोलाचा दस्तऐवज आहे असे गौरोद्गार आहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापिठाचे सहकुलसचिव प्रा.डॉ.शिवाजी शिंदे यानी काढले.
ते महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेने आयोजित केलेल्या भारती धनवे लिखित ‘दर्शनमात्रे” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या प्रकाशन समारंभाचे अध्यक्षस्थानी म.सा.प. पुणेचे सोलापुर जिल्हा प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी होते. यावेळी व्यासपीठावर म.सा.प. पुणे चे सोलापुर जिल्हा प्रतिनिधी कल्याण शिंदे, म.सा.प. दामाजीनगरचे अध्यक्ष प्रकाश जडे, कार्याध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार तथा मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर भगरे, ह.भ.प. प्रा.विश्वनाथ ढेपे, युवालेखिका निकिता पाटील, शिक्षक नेते संजय चेळेकर, लेखिका भारती धनवे, नागेश धनवे आदी मान्यवर उपस्थित होते.
दर्शनमात्रेवर भाष्य करताना युवालेखिका निकिता पाटील म्हणाल्या, दर्शनमात्रे हे कोरोना काळातील सकारात्मकतेचे सृजन आहे. हौस म्हणून केला जाणारा खर्च प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी वापरता आला तर?असा प्रश्न उपस्थित करुन इतिहास जाणुन घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन केले. ह.भ.प. प्रा.विश्वनाथ ढेपे यानी मंदिरातील कला आणि आध्यात्म यांचा सहसंबध आपल्या ओघवत्या वाणीतुन स्पष्ट केला. म.सा.प. पुणे चे सोलापुर जिल्हा प्रतिनिधी कल्याण शिंदे यानीही दर्शनमात्रेच्या प्रकाशना निमित्त भारती धनवे याना शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षक नेते संजय चेळेकर यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत साहित्याचे अभ्यासक दिगंबर यादव यांनी, सूत्रसंचालन जयश्री कवचाळे यांनी केले तर आभार सचिन गालफाडे यानी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यवाह लहु ढगे, कोषाध्यक्षा दया वाकडे डाॅ.दत्ता सरगर, डाॅ.अतुल निकम यांनी परिश्रम घेतले. पुस्तक प्रकाशन सोहळ्यास रसिक मंडळी,शिक्षकवर्ग फार मोठ्या संख्येने उपस्थित होता.