महात्मा फुले जयंती विशेष : आधुनिक युगातील महात्मांची सावित्री देतेय समाजप्रबोधनाचे धडे

लग्नानंतर शिक्षण घेत रेश्मा गुंगे यांचेकडून विद्यादान; पती माणिक गुंगे यांची मोलाची साथ

श्रीकांत मेलगे, ब्युरो चीफ-झेप संवाद न्यूज
मंगळवेढा, दि.11 : मुलीचे लग्न झाले म्हणजे तिचे शिक्षणही संपल्याची कित्येक उदाहरणे आज आपणास समाजात पहावयास मिळतात परंतु या बाबीला छेद देत गोणेवाडी (ता.मंगळवेढा) येथील माणिक गुंगे यांनी लग्नानंतर पत्नी रेश्मा गुंगे यांना उच्चशिक्षण दिले. आज आधुनिक युगातील महात्मांची ही सावित्री समाजप्रबोधनाचे धडे देत विद्यादानाचे कामही करत आहे.

विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले या विचारातून शिक्षणाचे महत्व आधोरेखित करणारे महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा फुले यांनी लग्नानंतर सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले व स्त्री शिक्षणाची प्रेरणा देत मुलींची शाळा सुरू केली.

फुले दांपत्याने अनेक सामाजिक चळवळी उभ्या करून आपला आदर्श साऱ्या देशासमोर ठेवला. फुले दांपत्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज अनेक कुटुंबे त्यांच्याच पाऊलवाटेने जात असल्याचेही आपल्याला वेळोवेळी पहावयास मिळते, त्यापैकीच एक म्हणजे गोणेवाडी (ता.मंगळवेढा) येथील गुंगे कुटुंब.

बारावीच्या परीक्षेत केंद्रात प्रथम आल्यामुळे सगळीकडे कौतुक होत असतानाच आता ग्रामीण भागात पुढील शिक्षण घेणे शक्यच नव्हते त्यामुळे रेश्मा चंद्रकांत जाधव यांचे लग्न होते व त्या गोणेवाडी येथील गुंगे कुटुंबाच्या सून होतात. लग्नानंतर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या माणिक गुंगे यांनी घरची परिस्थिती बेताचीच असतानासुद्धा पुढील शिक्षणासाठी पत्नी रेश्मा यांना प्रोत्साहित केलं.

ग्रामीण भागात पत्नीस शिकविण्याचा निर्णय घेतल्यानंतर काहींनी नाराजीही व्यक्त करत विरोधही केला. शिक्षणासाठी इतका खर्च करून काय उपयोग असे टोमणेही मारले. कोणत्याही विरोधाला न जुमानता पतीच्या प्रोत्साहनामुळे मुलगी संस्कृती सहा महिन्याची असताना डी.एड.पुढे पदवी नंतर दोन विषयात पदव्युत्तर पदवी, बीएड हे शिक्षण घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना कोणताही खंड येऊ न देता पूर्ण केले.

या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे या भावनेतून रेश्मा गुंगे ह्या गेली 14 वर्षे ज्ञानदानाचे काम करीत आहेत. शिक्षण देत असताना विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी निर्माण करण्याचे काम त्या अविरत करत आहेत. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, अभ्यासाबरोबर इतर कला कौशल्य निर्माण करण्यात त्याचा हातखंडा आहे.

शैक्षणिक क्षेत्राबरोबर पतीच्या प्रोत्साहनामुळे रेश्मा गुंगे या विविध वृत्तपत्रातून स्तंभलेखन, प्रासंगिक, ललित व वैचारिक लेखन तसेच साहित्य संमेलनात कथा व काव्य यांचे सादरीकरण करण्याचे कामही त्या करीत आहेत.

शैक्षणिक, सामजिक, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत एवढ्यावरच न थांबता गुंगे दांपत्याने पुढील उच्च शिक्षण घेण्याचे प्रयत्न सुरूच असून सध्या दोघेही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठात पी.एच.डी करीत आहेत.
आयुष्यात मेहनत ही सोनेरी चावी असून ती बंद भाग्यांचे दरवाजेही उघडते असाच काही जीवनाचा सहप्रवास करणाऱ्या माणिक व रेश्मा गुंगे यांचे काम समाजासाठी निश्चितच प्रेरणदायी आहे.

परिस्थितीवर मात करीत सहजीवनाचा प्रवास…
शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात काम करण्याबरोबर समाज प्रबोधनासाठी स्त्री सक्षमीकरण या विषयावर व्याख्याने देण्याचे काम रेश्मा गुंगे हया करीत आहेत. सामाजिक संस्था उभारून अनाथ आश्रमातील मुलांना धान्य वाटप, सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अनाथ मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण, कोरोना महामारीच्या काळात गोरगरीबांना मदत करण्याचेही काम गुंगे कुटुंबाने केले आहे. न हरता, न थकता, न थांबता परिस्थितीवर मात करीत सहजीवनाचा प्रवास अखंड प्रवास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here