गुढी उभारावी सत्कर्माची….!

गुढीपाडवा सणानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या दिवसापासून मराठी नववर्षाला सुरूवात होते महाराष्ट्र राज्यात तसेच काही बाहेर राज्यात सुद्धा गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्याच प्रमाणे घरोघरी जणू सणच असतो गावखेड्यात सुद्धा ह्या दिवशी घराघरात आनंद उत्सव असतो. या सणाच्या विषयी अनेकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारची श्रध्दा असते कोणी म्हणतात की, या दिवशी शुभ कार्य करायचे असेल कोणतेही मुहूर्त बघण्यासाठी आवश्यकता नाही म्हणून अनेकजण या दिवशी शुभ कार्य करत असतात. विशेष म्हणजे जी गुढी उभारली जाते त्यातील जे,काही साहित्य असते ती साहित्याने उभारलेली गुढी खूप काही शिकवण देऊन जाते. जसे तांब्याचा पेला,कडूलिंबाचे पाने,नवीन कापड, गाठी ,फुलांची हार तसेच बांबू याकडे बघतांना बरेच काही शिकायला मिळत असते. या उभारलेल्या गुढीची घरोघरी मोठ्या श्रध्देने पूजा केली जाते व पुरणपोळीचा नैवेद्य दाखविले जातात. तर काही घरी भजनाचे सुद्धा आयोजन केले जातात हा गुढीपाडव्याचा सण थोडा वेगळा सण आहे म्हणूनच त्यातून काहीतरी घेण्याचा नक्कीच प्रयत्न करावे. दरवर्षी घरोघरी गुढी उभारली जाते त्याच प्रमाणे गुढी वेगवेगळ्या प्रकारची उभारली गेली तर आनंदच आहे मग ती मनात असो किंवा सत्कर्मात असो किंवा कृतीतून असो पण, तशी गुढी अवश्य उभारावी.

गुढी उभारावी सत्कर्माची
स्नेह, प्रेम मनी असू द्यावे
गुढीचे महत्व जाणूनी
इतरांनाही सांगावे

एकदा तरी प्रत्येकांनी सत्कर्माची गुढी उभारावी आणि आजच्या घडिला अंत्यत काळाची गरज आहे. सर्वांशी प्रेमाने बोलून त्यांच्यात असलेले दु:ख जाणून घ्यावे,त्यांची आपुलकीने मदत करावी आणि स्नेहबंधनाचे धागे विणून एक माणुसकी धर्म निभावून दाखवावे खऱ्या अर्थाने हेही सत्कर्म आहेत फक्त त्याच्यात नि:स्वार्थ भावना असणे गरजेचे आहे.

गुढी उभारावी आपुलकीची
झाडांचे संगोपन करण्याची
त्याचे त्याग, प्रेम पाहूनी
काळजी घ्यावी झाडांची

झाड हे निसर्गाची देण आहे त्यांच्यामुळेच प्रत्येक जीवजंतूना फुकटात प्राणवायू, पाणी मिळत असते म्हणून सर्वजण त्यांच्या त्यागातून, आपुलकीतून, संघर्षातून सर्वजण जीवन जगत असतात. म्हणून त्यांची काळजी घेणे, एकतरी झाड लावून माणुसकी धर्म निभावून दाखवणे हे सुद्धा एक प्रकारचे सत्कर्म आहे.

गुढी उभारावी पुस्तकांची
ते बुद्धीवान बनवतात
गुरू बनून करतात मार्गदर्शन
यशाच्या शिखरावर पोहोचवतात

पुस्तकांशी मैत्री करावे, पुस्तक आपले गुरू असतात असे अनेकजण म्हणतात म्हणजेच पुस्तकात सारे काही विश्व असू शकते तिचे वाचन केल्याने मनात सकारात्मक विचार येतात, अंगात एक प्रकारची नवी उर्जा निर्माण होते सोबतच इतरांसाठी काहीतरी करण्याची मनात आवड निर्माण होत असते.म्हणजेच पुस्तकाचे वाचन करणे सुद्धा एक प्रकारचे सत्कर्म आहेच ज्या पुस्तकांनी आपल्याला ज्ञानवंत, हुशार बुद्धीवान बणविले त्या पुस्तकाच्या मार्गदर्शनातून समाजातील गोर, गरीब लोकांना रंजल्या, गांजल्यांना, बळीराजाला आपुलकीच्या नात्याने मदत करून त्यांना नव्याने जगण्यासाठी दिशा दाखवणे कदाचित हे सुद्धा एक प्रकारचे सत्कर्म असू शकते. या पृथ्वीतलावर अनेक जीवजंतूंनी जन्म घेतले आहेत पण,सर्वात श्रेष्ठ माणसालाच म्हटले गेले आहे कारण मनुष्य प्राण्याला बोलता येते,जगातील अशा सर्वच गोष्टीं विषयीची माहीती असते आणि तोच हे सर्व काही करवून दाखवू शकते ही त्याच्यात असलेली ताकद आहे,समज आहे. आजकाल समाजात वाढत असलेले स्वार्थ, अपमान, निंदा चुगली, द्वेष, कपट कारस्थान, खोटे बोलणे, व्यसन करणे, अंधश्रद्धा, भृणहत्या, अनादर, चोऱ्या असे अनेक कारनामे विचीत्र बघायला मिळत असतात . त्यामुळे कुठेतरी या व्यर्थ मोहाच्या आधीन झालेला माणूस आजकाल माणसापासून दूर निघून जाताना दिसत आहे. थोर, संत महात्मे,महापुरुषांच्या विचारांचा विसर पडलेला दिसून येत आहे सोबतच काम कमी पण, प्रसिद्धीच नव्याने जन्माला आलेली बघायला मिळत आहे या अशा विचीत्र बदललेल्या चित्रांकडे बघून समाजात राहणाऱ्या सर्व सामान्य लोकांच्या मनात समाधान कमी बघायला मिळत आहे. म्हणूनच असे विचित्रपणे वागणाऱ्या लोकांना चांगल्या मार्गाने लावणे व त्यांना नव्याने जगायला लावणे हे सुद्धा एक प्रकारचे सत्कर्म आहे. समाजासाठी चांगले काही करता येईल तेवढे नक्कीच करण्याचा प्रयत्न करावे. गुढीची शिकवण अंगिकारावी व एक माणूस बनून नव्याने जगण्याचा प्रयत्न करावे आपल्या हातून इतरांसाठी सत्कर्म व्हावे अशीच विचारसरणी मनात असणे आवश्यक आहे शेवटी माणूस नसल्यानंतर केलेले कर्मच मागे राहतात बाकी कितीही धनसंपत्ती कमावलेली असेल तरी ती कामाची नसते म्हणून एक गुढी सत्कर्माची उभारावी व तसेच संकल्प सुद्धा करावे जेणेकरून आपल्या कार्यातून इतरांच्या जीवनात आनंद येईल व जीवन जगण्याचा खरा अर्थ कळेल.

सौ.संगीता संतोष ठलाल,
मु.कुरखेडा, जि.गडचिरोली.
७८२१८१६४८५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here