मंगळवेढा, दि.06: मंगळवेढा तालुक्यातील सततचा दुष्काळ, शेतीमालाचा व दुधाचा कमी दर हटवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅवा अल्ला कबूल करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नेते तथा श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये सामाजिक कार्यात अभिजीत पाटील हे नेहमीच अग्रेसर राहिलेले दिसून येतात. सर्वधर्म समभाव हा त्यांच्या कार्याचा स्थायीभाव आहे, हे पुन्हा एकदा त्यांच्या या उपक्रमातून सिद्ध झाले. मंगळवेढा येथील गैबीपीर दर्गा परिसरामध्ये अभिजीत पाटील यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मतदार संघ अध्यक्ष मुज्जमील काझी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी, संतोष रणदिवे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत, शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, पंच गौस मुजावर, मुकद्दर मुजावर, अझर मुजावर, जावेद मुजावर, सादिक मुजावर, जमीर इनामदार, दामाजी माने, रज्जाक शेख, महादेव शिंदे, विठ्ठल कारखान्याचे संचालक सचिन वाघाटे, गणेश ननवरे, बाळासाहेब हाके, उमेश मोरे,धनाजी खरात, यासह मुस्लिम मौलाना व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष पाटील म्हणाले की, या देशाला पाच हजार वर्षाची परंपरा आहे. गेल्या अनेक वर्षापासून हिंदू- मुस्लिम हे बांधव मोठ्या गुन्यागोविंदाने नांदत असताना त्यामध्ये काही तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न असफल झाल्यानंतर आता मराठा -ओबीसी असा संघर्ष लावून दिला आहे,भविष्यात गरीब -श्रीमंत असाही संघर्ष लावून देण्याची शक्यता नाकारता येत नाही, पूर्वीच्या काळी दोन समाजातील होणारी मैत्री कौतुकास्पद होती. परंतु अलीकडच्या काळात जात बघून मैत्री करून लागले आणि ती होणारी मैत्री चिंताजनक असून शेतीमालाला दर नाही,माता माऊली सुरक्षित नाही,बेरोजगारी वाढली आहे.देशात सध्या हुकूमशाहीत वाढली आहे त्या विरोधात एकसंघपणे लढण्याची गरज आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जमीर इनामदार यांनी केले.