मंगळवेढा, दि.31 : अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, जातियवाद, धर्मांधता, दांभिकता अशा अनेक विकृती समाजात बळावत चाललेल्या असतानाही तरुणाई मात्र शांत आणि थंड दिसते. अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी युवकांनी पेटून उठावे असा संदेश अमरावती येथील समाजप्रबोधनकार डॉ रामपाल महाराज धारकर यांनी देत असताना तरुण असोनी रक्त न उसळे, नौजवान तुज म्हणू कसे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
छत्रपती परिवार आयोजित मरवडे फेस्टीव्हल सोहळ्यामध्ये तुरखेडा येथील डाॕ.रामपाल धारकर यांचा रामपालची सतर्कवाणी या कार्यक्रमातून सप्त खंजेरी वादनाच्या सुरेल साथीने किर्तनाच्या माध्यमातून समाजाला उपयुक्त असे सामाजिक प्रबोधन करीत रसिकांची मने जिंकली. या कार्यक्रमाचे उदघाटन भैरवनाथ शुगरचे मॕनेजर श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच अशोक पवार, दादासाहेब पवार, पैलवान दामोदर घुले, समाधान ऐवळे, संयोजक सुरेश पवार, अध्यक्ष रावसाहेब सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
डाॕ.रामपाल महाराज यांनी तरुणाई पुढील आव्हाने व आदर्श, बेरोजगारी, व्यसनाधिनता, शिक्षण, व्यवसाय अशा विविध ज्वलंत विषयांवर त्यांनी उदबोधन केले. संत साहित्याचे पुरावे देतानाच महापुरुषांच्या जीवन चरित्रातील दाखले दिले. विशेषतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांच्या साहित्याचे संदर्भ देताना तरुणासाठी ‘अग्नी भडकला युद्धाचा, आणि तू आळसी होऊन बसे ! तरुण असोनी रक्त ना उसळे, नौजवान तुज म्हणू कसे ?’ अशा पद्धतीने जनजागृती केली. सप्तखंजेरीच्या वादनामुळे संपूर्ण परिसरात उत्साही वातावरण तयार झाले होते.
या किर्तनाचे वैशिष्ट्य म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना अनेकविध प्रश्नांच्या माध्यमातून सहभागी करुन घेत नव्या पिढीला समाजसुधारकांचा विसर पडत चालला असून सवंग लोकप्रिय गीते मात्र पटकन तोंडात येतात हे सप्रमाण दाखवून दिले. आधुनिक माता पित्यांनी उमलत्या पिढीला संस्कारक्षम घडविण्यासाठी सजग रहावे असे आवाहनही त्यांनी केले.
आज मरवडे फेस्टीव्हल मध्ये काय पहाल ?