मंगळवेढा, दि.30 : मरवडे (ता.मंगळवेढा, जि.सोलापूर) येथील छत्रपती परिवार आयोजित मरवडे फेस्टीव्हल 2024 निमित्ताने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून आज शनिवार 30 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक सुरेश पवार यांनी दिली.
मरवडे फेस्टीव्हलचे यंदा 24 वे वर्ष असून त्या निमित्ताने देण्यात येणाऱ्या स्व. मुक्ताबाई कुंभार साहित्य गौरव पुरस्कारासाठी डाॕ. आशुतोष रारावीकर (मुंबई), भारत सातपुते (लातूर) , शिवाजी बागल (पंढरपूर) यांची निवड करण्यात आली आहे.
स्व.भागवतराव पवार कला गौरव पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका शकुंतला जाधव ( विरार – मुंबई ) तसेच संगीत विशारद प्रसाद पाटील सांगोला यांची निवड करण्यात आली आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, रोख रक्कम, शाल, फेटा, बुके असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
याशिवाय विविध क्षेत्रात मरवडे गावचा लौकिक उंचावणाऱ्या गावच्या सुपुत्रासाठी देण्यात येणारा मानाचा मरवडेभूषण पुरस्कार प्रा. डाॕ. संतोष सुर्यवंशी यांना घोषित झाला आहे. डाॕ.सुर्यवंशी यांनी अर्थशास्त्र विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले असून पी.एच.डी. सेट आहेत. ‘ अर्थसाक्षरता व अर्थसक्षमता ‘ हे ब्रीद घेऊन देशातील हजारो युवकांना आर्थिक बाबींशी निगडीत विषयांवर मार्गदर्शन करीत आहेत. एका शेतमजूर कुटूंबातील युवकाने घेतलेली झेप व अभ्यासूवृत्तीच्या बळावर मिळवलेला लौकिक थक्क करणारा असून यंदाच्या मरवडेभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
स्व. ठकुबाई दगडू जाधव श्रावणबाळ पुरस्कारासाठी महेश कुलकर्णी व परिवाराची निवड करण्यात आली आहे. वृद्ध व आजारी माता पित्यांची उत्तम पद्धतीने सेवासुश्रुषा करणाऱ्या मरवडे गावच्या सुपुत्राचा या पुरस्काराने गौरव करुन भावी पिढ्यांसमोर आदर्श ठेवला जातो.
मरवडे फेस्टीव्हल 2024 मध्ये आजचे विशेष –
मरवडे फेस्टीव्हलच्या रसिकांना अनुभवता येणार शिवचरित्रातील रोमहर्षक प्रसंगांचा ऐतिहासिक थरार…
मरवडे फेस्टीव्हलचा चौथा दिवस मरवडे फेस्टीव्हलच्या रसिकांसाठी तसेच शिवप्रेमी युवकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
आज शनिवार दि. 30 मार्च रोजी रात्री 7.30 वाजता मे.आवताडे शुगर्स नंदूर यांच्या सौजन्याने ” मुद्रा भद्राय राजते ! ” हे ऐतिहासिक नाटक मरवडे फेस्टीव्हलमध्ये सादर होणार आहे. रंगराव पाटील कोल्हापूर निर्मित या नाटकाच्या माध्यमातून शिवचरित्रातील 17 रोमहर्षक प्रसंगांचे प्रत्यक्ष सादरीकरण Live presentation होणार आहे . जवळपास 35 कलावंत सहभागी होणार आहेत.
उत्कृष्ट नेपथ्य, वेशभूषा रंगभूषा, ध्वनी व प्रकाशयोजना यामुळे हे ऐतिहासिक नाटक अधिक उठावदार ठरणार असून शिवप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.