मंगळवेढा, दि.29 : कोल्हापूरचे कवी उमेश सुतार यांनी सिस्टरीनबाई ही कविता सादर करताना
सिस्टरीनबाई,
पोलिओ, गोवर आणि धनुर्वात बरोबरच
एक थेंब बुद्ध, एक थेंब महावीर आणि जमलचं तर एक थेंब पैगंबरही द्या माझ्या पोराला,
कारण दंगलीच्या काळात दिवस गेलेत मला !
ही रचना सादर करुन सामाजिक अस्वस्थतेला वाट मोकळी करुन दिली. जातीच्या नावापेक्षा मातीशी नाळ पोराची जोडली जावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. निमित्त होते मरवडे (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथे आयोजित कवी संमेलनाचे.
छत्रपती परिवाराच्या वतीने आयोजित मरवडे फेस्टीव्हल सोहळ्याचा दुसरा दिवस निमंत्रित कवींच्या संमेलनाने संस्मरणीय ठरला. जातीयवाद, धर्मांधता, राजकीय मग्रुरी, सामाजिक विषमता आणि आर्थिक असमतोल यामुळे सामाजिक सभोवताल अस्वस्थ आणि काळवंडले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना, कुटूंबव्यवस्था आणि माणुसकीला जाणारे तडे अशा सामाजिक व्यंगावर कडक शब्दांत कवितांतून ओढल्या गेलेल्या आसूडांनी मरवडे फेस्टीव्हलच्या काव्य रसिकांना नामवंत कवींच्या काव्य रचनांनी मंत्रमुग्ध करतानाच अंतर्मुखही केले.
काव्यसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा.लक्ष्मण ढोबळे हे होते. संमेलनाचे उदघाटन उद्योजक प्रकाशराव येलपले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कवी शिवाजी सातपुते यांनी राजकीय धुळवडीच्या कविता सादर करुन काव्य रसिकांची दाद मिळवली. लातूरचे कवी रमेश चिल्ले यांनी बाप कवितेतून संसार गाडा ओढताना होणारी बापाची दमछाक मांडली. विनोद गादेकर यांनी गावावरुन हायवे गेला ही कविता सादर करताना अनेक गावांतून आणि घराघरांतून दिसणारा बदल मांडून सर्वांची करमणूक केली. गोविंद जाधव, सूर्याजी भोसले यांच्या कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. करवीरचे कवी विश्वासराव पाटील यांनी सादर केलेल्या गझल देखील रसिकांना चांगल्याच भावल्या.
मरवडे फेस्टीव्हलच्या माध्यमातून दोन तपांहून अधिक काळ अशी सांस्कृतिक व साहित्यिक चळवळ ग्रामीण भागात चालवून छत्रपती परिवाराने रसिक मनांची मशागत केल्याने या परिसरातील भावी पिढी सुजाण व सकस विचारांचे अधिष्ठान लाभलेली निर्माण होईल असा विश्वास माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मण ढोबळे यांनी यावेळी व्यक्त केला.
या कवी संमेलनाचे सूत्रसंचलन प्रा.चंद्रशेखर मलकमपट्टे यांनी, प्रास्तविक संयोजक सुरेश पवार यांनी केले तर आभार राजेंद्र कुलकर्णी यांनी मानले.