मंगळवेढा, ता.29 : मरवडे ( ता.मंगळवेढा ) येथील छत्रपती परिवाराच्या वतीने मरवडे गावाचा नावलौकिक सर्वदूर पोहोचविणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा यंदाचा मरवडेभूषण पुरस्कार प्रा.डॉ.संतोष दशरथ सूर्यवंशी यांना जाहीर करण्यात आला असून मरवडे फेस्टीव्हल 2024 मध्ये शनिवार दि.30 रोजी सायंकाळी सात वाजता मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
प्रा. डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी 2018 मध्ये अर्थसाक्षरतेतून अर्थसक्षम हे ब्रीदवाक्य घेऊन Bazaarbull युट्यूब चॅनलची सुरुवात केली. त्यापूर्वी 2013-14 ते 2019 पर्यंत श्री संत दामाजी महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. आज युट्युब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून राज्यातील आणि देशातील लाखो लोकांना जोडण्यात आले आहे. युट्युब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून गुंतवणूक कुठे करावी? का करावी? बचत का आवश्यक आहे. तसेच त्यांचे अर्थसाक्षरता या विषयावर कार्य सुरू आहे. त्यांच्या Bazaarbull Trading Academy च्या माध्यमातून शेअर मार्केटचे ॲडव्हान्स लेव्हलचे प्रशिक्षण आत्तापर्यंत राज्यातील 2000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. Bazaarbull ॲप देखील प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे.
स्टॉक मार्केट गुंतवणूक आणि ट्रेडिंग मध्ये 8 वर्षे अनुभव असून ते पीएचडी आणि अर्थशास्त्रात सेट धारक आहेत. NISM आणि NCFM डेरिव्हेटिव्ह प्रमाणित विश्लेषक, AMFI नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक आहेत. त्याचबरोबर सेबीने RKSV सुरक्षा खाजगीसाठी नोंदणीकृत अधिकृत व्यक्ती म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळविला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात मरवडे फेस्टीव्हलचे पुरस्कार अत्यंत मानाचे व प्रतिष्ठेचे मानले जातात. सन्मानचिन्ह, मानपत्र, फेटा, शाल, बुके असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यंदाचा मरवडे भूषण पुरस्कार प्रा. डॉ. संतोष सूर्यवंशी यांना जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा मरवडे फेस्टीव्हल 2024 चे संयोजक सुरेश पवार यांनी व अध्यक्ष रावसाहेब सूर्यवंशी यांनी केले. मरवडेभूषण पुरस्कार प्रा. डॉ. संतोष सूर्यवंशी यांना जाहीर झाल्याबद्दल सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.