प्रणिती शिंदे व राम सातपुते यांच्यात रंगली राजकीय धुळवड ; ट्विटर च्या माध्यमातून वार – प्रतिवार

श्रीकांत मेलगे / ब्युरो चीफ, झेप संवाद न्यूज

सोलापूर, दि.२५ : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून आमदार राम सातपुते व महविकास आघाडीकडून प्रणिती शिंदे यांना उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. उमदेवारी होताच आज धुळवडीच्या दिवशी या दोन उमेदवारांनी एकमेकांना ट्विटर वर पत्र लिहीत व या पत्रातून एकमेकांवर वार – प्रतीवार करीत राजकीय धुळवड साजरी केली.

 

प्रणिती शिंदे आपल्या पत्रात लिहतात,

मा. राम सातपुते जी,
आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणुक रिंगणात स्वागत आहे! सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे, इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापूरात स्वागत करते.

तसंच ह्या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळालीये त्या बद्दल शुभेच्छा देते.

लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्व असावं असं माझं मत आहे.

पुढील ४० दिवस याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते.

सोलापूरकरांच्या वतीने पुन्हा एकदा तुमचं सोलापूरात स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते.
– प्रणिती सुशीलकुमार शिंदे

तर या पत्राला राम सातपुते यांनीही उत्तर देताना म्हटले आहे की,

आ. प्रणिती शिंदेजी,

जय श्रीराम…!
मी २०१९ पासून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय. मी आमदार झाल्यापासून ते आजतोवर मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, आणि त्यायोगे सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या सेवेत माझ्या परीने प्रामाणिकपणे होईल तेवढी विकासकामे करण्याचा प्रयत्न केलाय.

मी ज्या भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, तिथे आम्ही समाजाला एकसंध ठेवण्यासाठी मा. नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास” या मंत्राला सार्थ ठरवत समाजातील शेवटच्या घटकाच्या कल्याणासाठी झटत आहोत. समाजात धर्म, जातीपातीत फूट पाडून कुणी एवढं वर्ष राजकारण केलंय, हे सोलापूरच्याच नव्हे तर पूर्ण देशाच्या जनतेनं आता चांगलंच ओळखलंय.

राजकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या कुटूंबात जन्मलेल्या माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पार्टीने जो विश्वास दाखवलाय, त्याला सोलापूरचा सर्वांगिण विकास करून सार्थ ठरवण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहीन.

वंदे मातरम्…!

आपला विनीत,
राम सातपुते

प्रणिती शिंदे व राम सातपुते यांच्या या सोशल मीडियावरील पत्रामुळे गेल्या काही दिवस वेट अँड वॉच च्या भूमिकेत असलेल्या कार्यकर्त्यामध्ये चांगलाच उत्साह संचारला असून आता ही दोन आमदार व युवा नेतृत्वाची लढाई चांगलीच रंगणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here