मंगळवेढा, दि.19: धनश्री मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मंगळवेढा या संस्थेने कृष्णनगर मंगळवेढा येथील स्व. संजय – सविता स्मृती सार्वजनिक वाचनालयाचे कामकाज व प्रगती पाहून तसेच या ग्रंथालयाचे ग्रंथालयीन कामकाज जलद, सुलभतेने होणे साठी व वाचकांना संगणकाच्या माध्यमातून जलद ग्रंथालयीन सेवा, संदर्भ सेवा उपलब्ध व्हाव्यात म्हणून ग्रंथालयास संगणक संच भेट दिला आहे.
यावेळी धनश्री मल्टीस्टेटचे व्यवस्थापक रमेश फडतरे यांनी वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड, सहसचिव धर्मराज जाधव, संचालक सतीश आवताडे यांचेकडे संगणक संच सुपूर्त केला. यावेळी लहू ढगे, वैभव खांडेकर, विकास माने, संकेत सातपुते, ऋषिकेश गायकवाड उपस्थित होते.
धनश्री परिवाराच्या माध्यमातून धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच सामाजिक उपक्रमांना मदतीचा हात दिला जातो. गेली पंचवीस वर्षे आपल्या स्वर्गीय संजय सविता स्मृती वाचनालयाच्या माध्यमातून वाचन चळवळ समृद्ध व बळकट करणाऱ्या राकेश गायकवाड यांच्या वाचनालयास आज धनश्री परिवाराच्या माध्यमातून संगणक संच भेट देण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे हे दातृत्व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थास निश्चितच अनुकरणीय ठरणार आहे.