मंगळवेढा, दि.18 : मरवडे (ता.मंगळवेढा) येथील छत्रपती परिवाराच्या वतीने मरवडे फेस्टीव्हलमध्ये साहित्य व कला क्षेत्रातील योगदानासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. या पुरस्कारासाठी 26 मार्च पूर्वी प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन संयोजक सुरेश पवार यांनी केले आहे.
साहित्यिक व कलावंतांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या मरवडे फेस्टीव्हलचे मागील २४ वर्षांपासून आयोजन करण्यात येते. त्या निमित्ताने विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या सोहळ्यात दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे साहित्य व कला क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी स्व. मुक्ताबाई कुंभार साहित्य गौरव पुरस्कार देण्यात येणार असून साहित्य क्षेत्रातील एकूण योगदानासाठी एका साहित्यिकाची जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. तर मागील दोन वर्षातील एका उत्कृष्ट साहित्यकृतीचा ही सन्मान करण्यात येणार आहे.
तर कलावंतांसाठी स्व. भागवत रामचंद्र पवार कला व लोककला गौरव पुरस्कार देण्यात येणार आहेत. यामध्ये कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी एका कलावंताचा तर लोककलेतील योगदानासाठी एका लोक कलावंताची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात साहित्य व कला क्षेत्रांत मरवडे फेस्टीव्हलचे पुरस्कार अत्यंत मानाचे व प्रतिष्ठेचे मानले जातात. रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र, फेटा, शाल, बुके असे या पुरस्काराचे स्वरुप असून 26 मार्च 2024 पर्यंत इच्छूकांनी आपले प्रस्ताव संस्थेकडे सादर करावेत व अधिक माहितीसाठी 7057475610 व 7588019940 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रावसाहेब सुर्यवंशी, ज्ञानेश्वर कुंभार, सिद्धेश्वर रोंगे यांनी केले आहे.