मंगळवेढा, दि.17: केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडी व राजकीय स्थिती या संदर्भात पत्रकारांची भूमिका कशी असावी यासंदर्भात मंगळवेढा येथील शासनमान्य मंगळवेढा तालुका पत्रकार संघाची विचार विनिमय बैठक आज घेण्यात आली. आदर्श आचारसंहितेचे पालन करीत निवडणूकीत वार्तांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत प्रतिज्ञा करण्यात आली.
सद्य राजकीय स्थितीबाबत चर्चाही झाली. पत्रकारांनी आपले दैनिक वृत्तपत्र, साप्ताहिक, वेब पोर्टल, यु ट्यूब चॅनेल, ब्लॉगचे काम हे समाजाभिमुख असावे. आपण प्रसिद्ध केलेली बातमी परावलंबी असू नये त्यासाठी आपले अस्तित्व निर्माण करावे. पत्रकारांनी ठराविक नेते, पदाधिकारी, सत्ताधारी, लोकप्रतिनिधी, विरोधक याबाबत योग्य न्याय देवून समतोल साधत लिखाण करावे. एखादा धनाढ्य पक्षाने अथवा नेत्याने आचारसंहितेच्या कालावधीत जाहीराती ऐवजी पेड न्यूजच्या दिल्या तर त्या टाळाव्यात. पेड न्यूज मुळे आदर्श आचासंहितेचा भंग होतो हे ध्यानी घेऊन सर्वसमावेशक पत्रकारिता करावी.
कांही नेत्यांच्या कार्यालयातील कर्मचारी, स्विय सहाय्यक मोजकी वृत्तपत्रे, यु ट्युब चॅनल व वेब पोर्टल हाताशी धरून हव्या तशा एकतर्फी बातम्या पसरविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे पत्रकारिता धोक्यात येत चालली आहे. सद्यस्थितीमध्ये वर्षभर अनेक पत्रकारांकडून नेते किंवा त्यांचे हस्तक हे आपल्या मर्जीप्रमाणे बातम्या प्रसिद्ध करून घेतात. मात्र एखादी बातमी न प्रसिद्ध झाल्यास संबंधित पत्रकाराकडे किंवा तो काम करीत असलेल्या वृत्तपत्राकडे जाणून बुजून दुर्लक्षित केले जाते. याबाबतही यावेळी चर्चा होवून प्रत्येकाने आपापली भमिका मांडली. अनेक बातम्या कॉपी पेस्ट करून नक्कल केली जात आहे अशा अनेक बाबीवरही चर्चा करण्यात आली.
बैठकीत पत्रकार सुरेश केंगार यांच्या मातोश्रीचे निधन, महेश वठारे यांच्या आजीचे निधन तसेच वाघमारे यांच्या दुःखद घटनेबाबत पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली व शोक व्यक्त करण्यात आला.