मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी ; आमदार आवताडेंच्या प्रयत्नांना यश

मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांना फायदेशीर ठरणारी 697.51 कोटीची उपसा सिंचन योजना

मंगळवेढा, दि.13: पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत तुम्ही समाधान आवताडे यांना निवडून द्या, मी महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो व मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मंजुरी देतो असा शब्द तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील सभेत मंगळवेढेकरांना दिला होता. त्या शब्दावर विश्वास ठेवून मंगळवेढेकरांनी समाधान आवताडे यांना आमदार केले. देवेंद्र फडणीस यांनी सरकारचा करेक्ट कार्यक्रम ही केला आणि आवताडे यांच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या पाठपुराव्याची दखल घेत आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेस मंजुरी देऊन मंगळेकरांना दिलेला फडणवीस सरकारने शब्दही पाळला. मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांना फायदेशीर ठरणाऱ्या 697.51 कोटीच्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस विनाअट मंजुरी देण्यात आल्याने मंगळवेढा तालुक्यातून पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेमध्ये लक्ष्मी दहिवडी, आंधळगाव, शेलेवाडी, लेंडवे चिंचाळे, खुपसंगी, नंदेश्वर, गोणेवाडी, जुनोनी, खडकी, पाटखळ, मेटकरवाडी, भोसे, रड्डे, सिद्धनकेरी, निंबोणी, जित्ती, खवे, येड्राव, शिरशी, भाळवणी, जालिहाळ, हाजापूर हिवरगाव, डोंगरगाव या गावांचा समावेश आहे. या गावांना भीमा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून 95 किलोमीटर मधून पोहोच कालव्याद्वारे योजनेसाठी आवश्यक 2.04 अघफु(५७.७६४ दलघमी) पाणी उचलून बंदिस्त नलिका प्रणाली द्वारे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतील 24 गावातील 17,186 हेक्टर दुष्काळी क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पाणी संघर्ष समितीने 35 गावच्या पाण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता त्यानंतर येथील पाणीप्रश्न चांगलाच पेटत गेला व या योजनेबाबत अनेक तर्कवितर्क वाढविले गेले.

पोटनिवडणुकीच्या प्रचारात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर-मंगळेवढ्याचा आमदार भाजपचा करा; मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी आणि गरज पडल्यास केंद्रातून पैसा उपलब्ध  करतो असे सांगितले होते. आमदार आवताडेंनी विधिमंडळाच्या अधिवेशनातही या योजनेसंदर्भात वेळोवेळी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सकारात्मक भूमिका घेत हा प्रश्न लवकरच मार्गी लावू असे उत्तर दिले होते. मात्र प्रस्तावात काही त्रुटी असल्याने त्याची पूर्तता करण्यासाठी बराच कालावधी गेला. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी देऊन आपला शब्द पाळल्याचे दाखवून दिले. या मंजुरीनंतर मंगळवेढा येथे त्या 24 गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवेढा येथील दामाजी पंतांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पेढे वाटले तसेच मतदारसंघातील गावोगावी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष करून आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here