मंगळवेढा, दि.१२: मरवडे गावचे सुपुत्र अॕड. नंदकुमार पवार यांच्याकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी प्रदेश काँग्रेस कमेटीने सोपविली आहे. मरवडे गावाच्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुरा खोचला गेला आहे.
अॕड.नंदकुमार पवार यांनी १९७९ साली तरुण वयात जनता पक्षातून निवडणूक जिंकून पंचायत समिती सदस्य म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला आरंभ केला. पंचायत समितीचे २३ वर्षे सदस्य म्हणून काम करताना सभापती , उपसभापती , पक्षनेते अशी विविध पदे त्यांनी सांभाळलेली आहेत . शिवाय दामाजी कारखान्याचे चेअरमन , राजर्षी शाहू औद्योगिक वसाहतीचे चेअरमन , रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे सल्लागार अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असून त्यांची कन्या अॕड.रोहिणी पवार यांनी देखील जिल्हा परिषद सदस्या म्हणून उठावदार काम करुन दाखविले होते.
मंगळवेढा तालुक्याचे ज्येष्ठ नेतृत्व म्हणून त्यांचा लौकिक असून जिल्हाध्यक्ष पदाची संधी मिळाल्याने मरवडे गावचा लौकिक उंचावला आहे.
सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवनसिंह मोहिते पाटील हे एका गंभीर गुन्ह्यांमध्ये अडचणीत आल्याने ते सध्या भूमिगत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पक्षांच्या बैठका, वरिष्ठ नेत्यांचे दौरे याला उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे पक्षाने काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्षांपैकी एकाकडे तात्पुरत्या स्वरूपात जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली होती.
ही लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्षासाठी अतिशय महत्त्वाची असल्याने सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर राखीव लोकसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाध्यक्षांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा तात्पुरत्या स्वरूपातील पदभार नव्याने कार्याध्यक्ष म्हणून निवड झालेले मंगळवेढ्याचे ज्येष्ठ नेते नंदकुमार पवार यांच्याकडे सोपवला आहे.
सोमवारी ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत नूतन कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी जिल्हाध्यक्षांच्या केबिनमध्ये पदभार स्वीकारला शिंदे यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.