‘अक्षरे अश्रुंची’ पुस्तकातून लोकांना प्रेरणा देण्याचे काम : तुषार गांधी

पन्नालाल सुराणा, डॉ. वा. ल. मंजुळ, प्रा.निशिकांत ठकार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पुणे,दि.११: उच्चवर्णीयाच्या घरचे पाणी पिण्याने दलितांची हत्या होते. हा कसला विकसित भारत होवू शकतो? जामनगरला झालेले कार्यक्रम हे संपत्तीचे प्रदर्शन होते. उद्या आपण प्रथम क्रमांकावर असू की नाही, या भीतीतून के लेले संपत्ती प्रदर्शन आहे. अशा पार्श्वभूमीवर लोकांना प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांची गरज आहे, ही गरज ‘अक्षरे अश्रुंची’ हे पुस्तक पूर्ण करते. आजच्या पिढीला चांगले शिक्षक मिळण्याची आवश्यकता आहे. असे मत महात्मा गांधी यांचे पणतू, गांधीवादी विचारवंत व लेखक तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

ते प्रा.डॉ.आप्पासाहेब पुजारी कुटुंबीय (मंगळवेढा) आणि तेजस प्रकाशन (कोल्हापूर) यांच्यावतीने पुणे येथे झालेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा, डॉ. वा. ल. मंजुळ, प्रा. निशिकांत ठकार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा व प्रा.डॉ.आप्पासाहेब पुजारी लिखित आणि तेजस प्रकाशन (कोल्हापूर) यांनी प्रकाशित केलेल्या ‘अक्षरे अश्रुंची-भाग १’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ स्तंभलेखक सुधींद्र कुलकर्णी, जलसंपदा खात्याचे माजी सचिव डॉ. दि. मा. मोरे, कामाक्षी भाटे, अन्वर राजन, नाडगौडा, बोथरा, प्रा.डॉ.आप्पासाहेब पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते’ अक्षरे अश्रुंची-भाग १’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पन्नालाल सुराणा, डॉ. वा. ल. मंजुळ, प्रा. निशिकांत ठकार यांना जीवनगौरव पुरस्कार प्रत्येकी २१ हजार रोख, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी प्रा.डॉ.आप्पासाहेब पुजारी यांचा जिव्हाळा एज्युकेशन ट्रस्ट च्या वतीने पुरस्काराने गौरव करण्यात आला.

प्रमुख पाहुणे डॉ. सुधींद्र कुलकर्णी म्हणाले, आप्पासाहेब पुजारी हे कर्मयोगी आहेत. त्यांनी दारिद्र्याच्या दुःखातून स्वतःच्या आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात सुखाचे मळे फुलवले. चार भिंतींच्या शाळेच्या बाहेरही उरते तेच शिक्षण असते. आज मात्र ट्यूशन हीच पर्यायी शिक्षण पध्दती होऊ पाहात आहे. पूर्वी शाळेच्या वेळेनंतरही घरी विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवणी घेणारे शिक्षक होते. आता जरी विकसित भारत चा नारा दिला जात असला, आर्थिक समृद्धी, जिडीपी चे दाखले दिले जात असले तरी भारत याआधीच सर्वार्थाने विकसित देश आहे. भारताची भाषा संपदा हीच मोठी संपत्ती आहे. अजून ५० वर्षांनी मराठी, कन्नड सारख्या प्रादेशिक भाषा नष्ट होणार असतील, तर भारत विकसित होवून काय उपयोग होणार? इथून पुढे भाषेची, साहित्याची समृध्दी देखील जपली पाहिजे. यावेळी पन्नालाल सुराणा, निशिकांत ठकार, वा. ल. मंजूळ, आप्पासाहेब पुजारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश यादव यांनी केले. तर कार्यक्रमास मंगळवेढा येथून गजानन घारगे, पार्थ घारगे, आंधळगावचे अनील नागणे,सुरेखा नागणे, सौ.शकुंतला पुजारी, धारवाडचे प्रा.डी.जी.एम नाडगौडा, सांगलीचे शंकर जाधव, मंगला जाधव यांनी हजेरी लावली.

अक्षरे अश्रुंची हे फक्त पुस्तक नाही तर हे माझं आत्मचरित्र नाही. विविध आठवणी सलगपणे यात गुंफलेल्या आहेत. ज्यांच्या आत्मचरित्राने इतरांचे आत्मे उजळून निघतात ते खरे आत्मचरित्र. म्हणून माझ्या या पुस्तकाला आठवणीचे संच म्हटले आहे.
– प्रा.डॉ. आप्पासाहेब पुजारी,
अक्षरे अश्रुंची या पुस्तकाचे लेखक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here