बालाजीनगर, दि.09: श्री बालाजी शिक्षण मंडळ बालाजीनगर संचलित प्राथमिक / माध्यमिक आश्रम प्रशाला कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बालाजीनगर (ता.मंगळवेढा, जि.सोलापूर) येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री बालाजी शिक्षण संकुलात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशाखा समितीच्या अध्यक्षा तथा ज्येष्ठ सहशिक्षिका पद्मावती राठोड ह्या होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा.अनुजा चौगुले- सोनगे ह्या उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर महिला अधिक्षिका संगीता पवार, लता मारुती राठोड, विशाखा समितीच्या उपाध्यक्षा प्रा.वर्षा कलुबर्म, बालाजी पतसंस्थेतील कर्मचारी सुनीता फत्तुसिंग राठोड, चांदुबाई रामसिंग पवार, मंगल हच्चू राठोड, निर्मला फुलसिंग राठोड, सुनीता मनोहर राठोड, जयश्री संजय राठोड, शांताबाई दगडू राठोड यांच्यासह माध्यमिक आश्रम प्रशाला, कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गणपती पवार, पर्यवेक्षक कुंडलिक पवार, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विलास पवार तसेच बालाजी शिक्षण संकुलातील मुली उपस्थित होत्या. सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व बालाजी शिक्षण संकुलाची संस्थापक स्वर्गीय लालसिंग रजपूत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्राचार्य गणपती पवार यांनी सांगितले की, चूल आणि मूल या चक्रव्युहात अडकलेल्या महिला शिक्षणामुळे विविध क्षेत्रात अग्रेसर असताना दिसून येतात. भविष्यात आपल्याला जर स्वाभिमानाने जगायचे असेल तर प्रत्येक मुलीने उच्च शिक्षण घेतले पाहिजे. आज महिलांना विविध क्षेत्रात मार्गक्रमण करण्यासाठी संधी मिळत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील कोणतेही क्षेत्र असो तिथे महिला काम करताना दिसतात एवढेच नव्हे तर अंतराळ मोहिमेतही महिलांनी आपला सहभाग नोंदवला आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे. कोणी म्हणतं शिक्षण घेतल्यामुळे सर्वांनाच नोकरी कुठे मिळते परंतु नोकरी म्हणजेच सर्व काही नसून आपले जीवन व आपली पुढची पिढी समृद्ध करण्याच्या दृष्टीनेही शिक्षण तेवढेच आवश्यक आहे. आपल्या बालाजी शिक्षण संकुलातही मुलींच्या शिक्षण, आरोग्य व संरक्षणाच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली जाते त्यामुळे येथील मुलींनी आपल्या यशाची पताका जगभर मिरवावी एवढीच अपेक्षा आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षण संकुलातील सर्व महिलांचा व मुलींचा सत्कार करण्यात आला. यावेळी विशाखा समितीचे अध्यक्ष पद्मावती राठोड, प्रा.अनुजा चौगुले – सोनगे, महिला अधीक्षिका संगीता पवार यांनी आपले मत व्यक्त केले.
जागतिक महिला दिनानिमित्त श्री शिक्षण संकुलात शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, कार्यरत महिला कर्मचारी यांना संस्थापिका तुळसाबाई लालसिंग राजपूत, डॉ.ममता राहूल रजपूत, वैशाली उत्तमसिंग रजपूत, मनीषा युवराज चव्हाण, विजया जयसिंग जाधव यांनी संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सूत्रसंचालन श्रीधर कुलकर्णी यांनी तर आभार मनोहर शिंदे यांनी मानले. कार्यक्रम करण्यासाठी श्री बालाजी शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.