श्रीकांत मेलगे, ब्युरो चीफ – झेप संवाद न्यूज
मंगळवेढा, दि.08: बालाजीनगर (ता.मंगळवेढा) येथील बालाजी शिक्षण संकुलाचे संस्थापक तथा सोलापूरचे माजी उपमहापौर लालसिंग रजपूत यांचे कोरोना काळात आकस्मित निधन झाले. ओसाड माळरानावर नंदनवनाच्या रुपात वसलेले बालाजी शिक्षण संकुल यशाचे टप्पे पार करीत झेप घेत असताना (कै.) लालसिंग रजपूत यांच्या निधनाचा धक्का रजपूत कुटुंबीयांना सहन करण्यापलीकडे होता परंतु बालाजी शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांना मायेची ऊब कायम रहावी यासाठी तुळसाबाई लालसिंग रजपूत यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी घेत ही जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. बालाजी शिक्षण संकुल आता नंदनवनाच्या रूपाने पुन्हा नव्याने उभारी घेत आहे.
ज्या समाजातील लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. सहा महिने इतर गावातील सुगी तर उर्वरित सहा महिने गावात राहून कुडाच्या झोपडीत गरिबीचे जिणे जगावं लागत होतं. हा भटकंती करणारा लमाण समाज कुठेतरी स्थिरस्थावर व्हावा यासाठी (कै.) लालसिंग रजपूत यांनी गावातील लोकांना सोसायटीच्या माध्यमातून चांगली घरे उभा करून भटकंती करणारा लमाण समाज स्थिर करत बालाजीनगर सारखी ग्रामपंचायत वसविली. सलग 35 वर्षे बिनविरोध महिला ग्रामपंचायत हा नाव लौकीकही मिळवला. समाजातील मुलांना पाटीवर मुळाक्षरे गिरविण्यासाठी शेकडो वर्षाचा कालावधी गेला त्या समाजातील मुले आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत शिक्षण घेऊन सन्मानाने उभी राहावीत यासाठी बालाजी शिक्षण संकुल उभे करून भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. समाजासाठी आयुष्य घालवित असतात (कै.) लालसिंग रजपूत यांना त्यांच्या पत्नी तुळसाबाई रजपूत यांचीही मोलाची साथ मिळत होती.
ओसाड माळरानावर नंदनवनाच्या रूपाने बालाजी शिक्षण संकुल बहरत असतानाच अचानक 23 मे 2020 रोजी काळाने घाला घातला अन (कै.) लालसिंग रजपूत यांचे निधन झाले अन् बालाजी शिक्षण संकुल पोरके झाले. प्राथमिक, माध्यमिक आश्रम शाळा, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, बालकाश्रम, विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, मागासवर्गिय मुला-मुलींचे वसतिगृह यामधून सुमारे 1500 विद्यार्थी शिक्षण घेत असताना तर 500 हून अधिक विद्यार्थी निवासी स्वरूपात राहत असताना या शिक्षण संकुलाची जबाबदारी कोण सांभाळणार हा प्रश्न पुढे येताच (कै.)लालसिंग रजपूत यांच्या पत्नी तुळसाबाई रजपूत यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. ज्या गावात आपण जन्मलो, त्या गावचे-समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून काम करणारे (कै.)लालसिंग रजपूत यांच्या विचारांचा वारसा चालवीत त्याच वाटेने प्रवास करणे जिकीरीचे काम परंतु तुळसाबाई रजपूत यांनी हे काम सेवावृत्तीने स्वीकारले असून समर्थपणे पार पाडीत आहेत.
बालाजी शिक्षण संकुलातील विद्यार्थी, पालक असो की कर्मचारी यांच्याशी संवाद साधत यांची त्या आपुलकीने चौकशी करणे व त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने विचारधन देणे, बालाजी शिक्षण संकुलाचे नाव देशाच्या नकाशावर आणण्यासाठी व येथे शिकलेल्या विद्यार्थ्याची किर्ती जागतिक स्थरावर जाण्यासाठी तुळसाबाई रजपूत या सदोदित प्रयत्नशिल आहेत. पतीच्या निधनानंतर तुळसाबाई रजपूत हया बालाजी शिक्षण संकुलाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत असताना त्यांना उत्तमसिंग रजपूत, अमरसिंग रजपूत, मनीषा युवराज चव्हाण, विजया जयसिंग जाधव, राहुल रजपूत, वैशाली रजपूत, डॉ.ममता रजपूत, प्रा.शिवलाल जाधव, हरिश्चंद्र राठोड, आप्पासाहेब पाटील, प्राचार्य गणपती पवार, पर्यवेक्षक कुंडलिक पवार, मुख्याध्यापक विलास पवार, बालाजी शिक्षण संकुलातील कर्मचारी व बालाजीनगर ग्रामस्थ यांचेही सहकार्य मिळत आहे.