‘तू उड तो सही,
तेरे लिए पुरा आसमान बाकी है !
तु कोशिश कर तो सही,
तेरे लिए पुरा जहान बांकी है”!!
स्पर्धा परीक्षा म्हणलं की संघर्ष तर आलाच पण जर एक मुलगी अन स्पर्धा परीक्षा म्हटलं की तिचा हा संघर्ष अजून वाढला. सर्वसाधारण कुटुंबातील मुलीचं जर खप्न असेल की तिला एक प्रशासकीय अधिकारी बनायचंय तर सगळ्यात पहिला अन् सगळ्यात मोठा संघर्ष म्हणजे तिला तिच्याच आयुष्यातली काही वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी घरच्याकडून मागून घ्यावी लागतात अन् त्यासाठी घरच्यांना विश्वास पटवून दयावा लागतो, तर काहींना अर्थिक परिस्थितीवर मात करावी लागते अन तिचा हा स्वप्नपूर्तीचा प्रवास चालू होतो.
आपण नेहमी प्रयत्न हे यश मिळवण्यासाठीच करत असतो पण या प्रवासामध्ये खूप सातत्याने मेहनत करावी लागते व त्याचबरोबर सहनशीलताही अंगी बाळगावी लागते. या प्रवासामध्ये कधी कधी निराशा ही वाटेला येते तेव्हा मात्र हा संघर्ष अजून वाढतो.
सुरुवातीच्या काळात तर समाजाला उत्तर देणं सोपं असतं की ‘स्पर्धा परीक्षेची तयारी चालू आहे’ असे सांगणे. परंतु जेव्हा ३-४ वर्ष सातत्याने अभ्यास करूनही अपयश वाट्याला येते तेव्हा हा संघर्ष एक वेगळेच रूप धारण करतो… काहीजण या निराशेतून स्वतःला सावरतात तर काहींसाठी तो जीवावर बेतणारा ठरतो.
जसजसा वेळ जातो तस वाढत्या अपेक्षाचं ओझं मनावर घेऊन अन येणाऱ्या अपयशातून खचून न जाता प्रयत्न करत राहणे. अपयश अन अपेक्षा यांची सांगड घालुन अभ्यास सुरू ठेवणं हे सर्वांत आव्हानात्मक कार्य असते अन अपयशानंतर तो खरा सुरु होतो संघर्षमय प्रवास…
एकीकडे मनाचा संघर्ष म्हणजे अपयशावर मात करून आपल्या स्वप्न पूर्तीसाठी धडपडण्याचा, प्रत्येक वेळी सणावाराला घरी जाण्याची इच्छा असतानाही दिवसभर अभ्यासिकेमध्ये बसून स्वतःच्या मनाला समजूत घालण्याचा, की पुढच्या वर्षी नक्कीच घरच्यांसोबत सारे सण आनंदाने साजरे करणार. या आशेखाली अजून नव्या उर्जेने, नव्या उमेदीने प्रयत्न चालू ठेवण्याचा संघर्ष.
तर दुसरीकडे या समाजाला, नातेवाईकांना अन त्यांनी विचारलेल्या ‘मग काय झाले का नाही मॅडम, अजून किती वर्ष शिकायचं बास आता लग्नाचं बघा यांसारख्या अनेक प्रश्नांना अन् मारलेल्या टोमण्यांना तोंड देण्याचा संघर्ष, तर दुसऱ्या सामाजिक घटकांसोबल केलेल्या तुलनेला जस की त्यांचा मुलगा – त्याची मुलगी तुझ्या मागून कामाला लागली अन तु अजून अभ्यासच करतेय तुला काही जमणार नाही, तुला काही येत नाही अश्याप्रकारचे बोलणेही ऐकायला लागते.
कोणतेही कार्य लहान किंवा मोठं नसतंचं मुळी पण कार्य जितकं मोठे त्यासाठी लागणारा वेळ आणि कष्टही तितकंच मोठं असतं आणि या गोष्टीची जाणिव अजून तरी जास्त लोकांमध्ये दिसून येत नाही ही मोठी खंत आहे.
अशा या संघर्षमय प्रवासामध्ये अपयशाच्या भीतीने खचून न जाता थोडी अजुन मेहनत करू अस म्हणत पुन्हा नव्या उर्जेने, नव्या उमेदीने, नव्या आत्मविश्वासासह हा प्रवास चालू होतो… स्वप्न सत्यसृष्टीत उतरवण्याचा.
कालांतराने अशी वेळ येते की एवढ्या संघर्षावर विजय मिळवलेला असतो की नंतर संघर्ष हा संघर्ष वाटतच नाही, तो तर जीवनाचा एक भाग बनलेला असतो. अन यातूनच सुरू होतो तो म्हणजे यशाचा प्रवास….. स्पर्धा परीक्षेत यश मिळो किंवा ना मिळो पण संघर्षात्मक प्रवासातून माणसाला माणूस म्हणून कस जगायचं याची शिकवण मात्र नककी भेटते. माणसाला आयुष्याच्या प्रत्येक समस्येवर मात करायला बळ आणि बुद्धी मिळते.
असा हा स्पर्धा परीक्षेचा प्रवास काही सोपा नसतो त्यामागे बराच संघर्ष असतो पण बाकीच्यांना कदाचित तो दिसत नसावा त्यांना दिसतो तो फक्त निकाल, त्यानंतरचा सत्कार, पुष्पगुच्छ, पेढे आणि मिळणारा मानसन्मान.
यश तुमचेच आहे हे ध्यानी ठेऊन संघर्षातून प्रवास करत आपल्याला काहीही करून मेहनतीच्या जोरावर अधिकारी व्हायचे आहे अशी खूणगाठ मनाशी बांधली तर यश तुमची वाट पाहतंय. आपणा साऱ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा….
– तेजस्वी भारत लेंडवे, ( महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या जलसंपदा विभागाच्या परीक्षेत यश व सहाय्यक अभियंता श्रेणी दोन साठी निवड)