महिला दिनाच्या काही दिवसापूर्वी पुण्यातील शिक्षण घेणाऱ्या मुलींचा ड्रग्ज घेऊन केलेल्या नशेतील व्हिडिओ व्हायरल झाला आणि मन उद्विग्न झाले. विचार केला आज जर सावित्रीबाई फुले असत्या तर त्यांना काय वाटले असते ज्यांनी पुण्यात भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली त्या पुण्यातील शिकलेल्या मुलींची ही अवस्था.
खरंच प्रश्न पडतो आपण शिकलो म्हणजे प्रगत झालो का? महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आदी लोकांनी सर्वसामान्यांना शिक्षणाची द्वारे खुली केली पण त्यातून फक्त पदवीधर बाहेर पडताना दिसतात आपली संस्कृती, आपली मूल्ये, आपले संस्कार यांना तिलांजली देऊन आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्य बरबटलेल्या संस्कृतीचे अंदाधुंद अनुकरण आपल्याला रसातळाला घेऊन जात आहे.
सावित्रीबाईंना अपेक्षित अशी सुशिक्षित महिला ही वैज्ञानिक जाणीवची भान असणारी सोबत संस्काराची शिदोरी ही घेऊन जाणारी होती. आज महिलांनी सर्व क्षेत्रात खूप मोठी भरारी घेतलेली आहे. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आता महिला काम करू लागलेले आहे परंतु महिलांना होणारे त्रास याबद्दल ती कोणालाही सहसा बोलत नसते. तिच्या जवळच्या घरच्या लोकांनी तिला समजून घेणे खूप गरजेचे आहे कारण तिला होणारे काही त्रास हे ती व्यक्तही करू शकत नसते. एकाच वेळी घरची जबाबदारी, कामाच्या ठिकाणचे वर्कलोड यात तिची घुसमट होताना दिसते. ती स्वतः एक बायको म्हणून, आई म्हणून, सून म्हणून, कंपनी कर्मचारी म्हणून सर्वस्व देण्याचा प्रयत्न करत असते त्यातच तिची दमछाक होत असते तेव्हा सर्वांनी तिला समजून घेणे गरजेचे वाटते. फक्त समजून न घेता तिला होईल तेवढी मदत करणे महत्त्वाचे. जसे की प्रत्येकाला हातात चहा, जेवण, पाणी आणून तिनेच देण्यापेक्षा प्रत्येकाने स्वतः उठून जरी तयार केलेला नाष्टा स्वयंपाक घरातून आणला तरी एवढ्या आपल्या छोट्याशा मदतीनेही तिला काम करायला हुरूप येत असतो.
संपूर्ण कुटुंबाचा मध्यबिंदू एक महिलाच असते तिच्या भोवतीच संपूर्ण कुटुंबाचा गाडा फिरत असतो फक्त तिने आपलं महत्त्व ओळखून स्वतः स्थिर राहणे त्यासाठी स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे कारण तिचं अस्थिर होणं संपूर्ण कुटुंबाच बॅलन्स बिघडवून टाकत असतं. घरच्यांनीही तिचे महत्त्व जाणून तिची काळजी घेतली पाहिजे. फक्त एक दिवस महिला दिनी तिचा गौरव सन्मान न करता तिच्या कामाचं कष्टाचं कौतुक केलं तर हे तिच्यासाठी मोठ्या पुरस्कारापेक्षाही मोठं असतं अन् तोच खरा तिच्यासाठी सन्मान असतो.
– डॉ. सौ. रोहिणी अतुल निकम, (मंगळवेढा, सहयोगी- संजीवनी हॉस्पिटल)