दुरून डोंगर साजरे दिसतात
अशीच आम्हां बायकांची अवस्था आहे
आलेला हुंडका दाबून धरत
वरवर हसायची व्यवस्था असते.
अशी व्यवस्था माझ्या लहानपणी मला पाहायला मिळाली.त्या काळात घरात पुरुष सत्ता असल्यामुळे डोक्यावरचा पदर खांद्यावर नसायचा, बाहेर कुठे जायची सोय नव्हती; मुलीपेक्षा मुलाला एक घास वरचढ असायचा, घरात बाईचा आवाज नसायचा, पुरुष म्हणेल ती पूर्व दिशा तिला बोलायला सोय नसायची; पुरेसे शिक्षण घेतलं की मुलीचे लग्नाची घाई असायची, ‘दिल्या घरी सुखी राहा’ हा आशीर्वाद असायचा. आईचा तिच्या घरी हस्तक्षेप नसायचा. असं सारं चाललेलं असायचं घर कामांमध्ये ती गुरफटलेली दिसायची, घरातील काम आणि पाहुणचार यातून तिला सवडच नसायची बाहेरचं ज्ञान फारसं नसायचं म्हणून तिला कितीतरी वेळा अडाणी म्हणून संबोधले जायचं.! अशाच परिस्थितीत तिनं कितीतरी दशक सहन केली. कुटुंबाचा आधार बनुन राहिली. कर्तव्य चोख पार पाडत राहिली. नात्याची विन घट्ट विणत राहिली.
आता काळ बदलला स्त्रीला स्वातंत्र्य मिळालं, शिक्षण मिळालं,घराबरोबर बाहेरची जबाबदारी तिने स्वीकारली. ती कामासाठी बाहेर जाते. घरी पुन्हा कामासाठी येते.कामाचा व्याप वाढला पुरुषांबरोबर पगारही घेऊ लागली. कामाच्या ठिकाणीही पुरुष प्रवृत्तीचा प्रभाव दिसून येतो. तरीही न डगमगता परिस्थितीला टक्कर देत लढते आहे. तिचे स्वप्न साकार करते आहे. हे सार कष्ट स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली सहन करते आहे. तिला आनंद एकाच गोष्टीचा वाटतो की , आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. मनासारखं जगता येणार आहे .या आशेवर ती सकाळी उठल्यापासून ती सरल्या रात्रीपर्यंत कामच करते आहे. दुसरी बाजू अशी आहे. ति स्वातंत्र्याचा दुरुपयोग तर करत नाही ना..! स्त्रीला स्वातंत्र्य मिळाले. सर्व अधिकार तिच्या हातात आले. तासनतास मोबाईल घेऊन ऑनलाइन शॉपिंग मध्ये तर गुरफटली नाही ना ..?घरात टीव्ही आला ज्ञानाच्या गोष्टी पाहण्याऐवजी मालिका पाहण्यात व्यस्त तर नाही ना..? असा प्रश्न निर्माण होतो आहे.
आज कॉलेजमधील मुला मुलींचे राहणीमान पाहिलं तर अतिशय विदारक चित्र समोर आल्याचे पाहायला मिळते. कॉलेजचे नाव करून अनेक चुकीच्या गोष्टीच्या आहारी आजची तरुण पिढी गेलेली पाहायला मिळते. आणि नंतर मग कॉलेज मधील मुली ह्या मुलांच्या नावाने तक्रार करताना दिसतात..? कितीतरी मुली मोबाईलचा अतिरेक वापर करून फसल्या जातात शेवटी पश्चाताप येतो. का त्यांना आठवत नाही..? आम्ही सावित्री-जिजाऊच्या लेकी आहोत. झाशीची राणी लक्ष्मीबाई एकट्या इंग्रजांशी लढल्या… आजच्या मुली अशा मोकाट हिंडणाऱ्या मुलांना आळा घालू शकत नाही का..? सावित्रीबाईनी स्त्री शिक्षणाचे धडे दिले म्हणून आजची स्त्री साक्षर झाली. पण आजच्या साक्षर स्त्रीला दुसऱ्या एका स्त्री विषयी सहानुभूती वाटते का..? समाजात अनेक महिला विधवा,घटस्फोटीत आहे. अशा महिलांशी सहानुभूतीपूर्वक वागणे आहे का..? एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचा सन्मान केला तर आत्मसन्मान वाढेल. खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करतो त्याचा आनंद होईल. आज महिला सर्व क्षेत्रात नावलौकिक मिळवत आहे. याचा अभिमान सर्वांना आहे तिच्या करिअरसाठी जिथे मार्ग तिथे काटे सुद्धा आहेत. म्हणजेच जिथे मार्ग आहे तिथे अडचणी सुद्धा आहेत त्या अडचणीवर मात करून ती यशस्वी होताना दिसून येते.
उंच उंच उडे झोका, मन आनंदी आनंद असाच साजरा करते आहे. वास्तव हे आहे की ग्रामीण भागात स्त्री ही अशिक्षित आहे रोजगार करते आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगत मुलांना उच्च शिक्षण देते आहे. मुलं सुसंस्कारशील बनवते आहे. ध्येयापर्यंत पोहोचवते आहे.यासाठी कोणत्याही विद्यापीठात तिने डिग्र्या घेतल्या नाहीत तर तिच्या कुटुंबासाठी केलेल्या आत्मसमर्पणामुळे शक्य होत आहे. अशा स्त्रियांचा खऱ्या अर्थाने सन्मान झाला पाहिजे. असं मला वाटतं. स्त्री स्वातंत्र्य आहे. या दिवसात तिची कर्तव्य जबाबदारी खऱ्या अर्थाने तिने पेलले आहेत का..? याचा सुद्धा विचार तिने केला पाहिजे.! आज पूर्ण कुटुंबाची जबाबदारी तिच्यावरती आहे. ती समर्थपणे पेलते आहे.तरीही वास्तवात काही ठिकाणी स्त्री-पुरुष समानतेचे चित्र दिसत नाही… अशावेळी घरातील स्त्रीने प्रत्येक स्त्रीला पाठिंबा दिला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा केल्याचा आनंद मिळेल..!
– प्रा.सौ. रेश्मा माणिक गुंगे,(14 वर्षे ज्ञानदानाचे काम, उत्तम निवेदिका, ख्यातनाम व्याख्यात्या, विविध वृत्तपत्रातून स्तंभलेखन, प्रासंगिक, ललित व वैचारिक लेखन तसेच साहित्य संमेलनात कथा व काव्य यांचे सादरीकरण)