स्री जन्म 

चिंच कोवळ्या वयाची

होई अवेळी गाभूळ..

बाई बाई जन्म तुझा

बांधावरली बाभूळ..

स्री जन्म म्हटलं आणि या माझ्या ओळी सहजच ओठांवर रेंगाळल्या. स्री ला अवेळी गाभूळ होण्याचं वरदान तर मिळालचं आहे पण कधी कधी तो शाप ही वाटतो कारण अवेळी गाभूळ होवून कोवळ्या देहावर अन् मनावर लालसेच्या किती तरी नजरांचे वार तिला झेलावे लागतात..जिथं पिवळ्या फुलांची हळद लावून बाभूळ जीवनाच्या बांधावर लाजत मुरडत पदर पसरून आनंदाची वाट पहात उभी असते तिथेच वेदनेच्या काट्याचा शालू तिला भेट म्हणून चढवला गेलेला असतो… जेव्हा तिला सुशोभित करण्यासाठी तिच्या गळ्यात मंगळसूत्र पायात पैंजण जोडवे, हातभर बांगड्या, कानात डुल हे अलंकार घातले जातात तेव्हाच अनामिक अस्पष्ट बंधने तिच्या त्या अलंकारामधून तिच्यावर लादली जातात…

त्या अलंकारांची, बंधनाची तिला इतकी सवय होते की ते तिला सर्वस्व, जबाबदारी, कर्तव्य वाटू लागतात.. त्या जबाबदारी खाली तिचे अनेक स्वप्न श्वास घेण्या आधीच गुदमरायला लागतात..

प्रश्न तिच्या स्वातंत्र्याचा नसतोच कारण तिला तो बंदीवास वाटतच नाही..तिच्या मनाला शरीराला या गोष्टीं ची सवय झालेली असते…खरंतर जबाबदारी पेलणं आणि स्वतःला स्वतःच्या अस्तित्वासह आणि स्वप्नांसह त्या प्रवाहात झोकून देणं यातला फरक तिला कधी कळतच नाही..

स्री स्वतः चे निर्णय स्वतः घेवू शकत नाही, स्री परपुरुषांशी बोलू शकत नाही, मोकळं खळखळून हसू शकत नाही, तिचा पेहराव तिची वागणूक ही सभोवतालच्या लोकांना खटकणार नाही अशीच असावी..तिचे स्वतंत्र विचार नसावेत..मनाविरुद्ध घटना घडल्या तरी ती आवाज उठवू शकत नाही..असे बरेचसे समाजाने लादलेले नियम ती अंगीकारून घेते आणि हे तिथचं थांबत नाही तर ती पिढ्यानपिढ्या, हे घरंदाज संस्कारित स्री चे नियम प्रत्येक स्री वर्गावर लादत जाते…मग सून असो की मुलगी..तिचं स्वतः च अस्तित्व आहे हे ती विसरून जाते.. आणि अशा नियमाविरूद्ध जाण्याचा प्रयत्न केला किंवा उंबऱ्याबाहेर स्वतंत्र विचार घेऊन पडण्याचा विचार केला की तिथून सुरू होतो तिचा संघर्ष.. तिथून केले जातात तिच्यावर आरोप, प्रत्यारोप आणि ती चरित्र हीन असल्याचे शोधले जातात पुरावे…

खरतरं तिच्यावर अन्याय करणारा पुरूष च असतो असे नाही त्यात दुसऱ्या स्रीचा मोठा हातभार असतो. एका स्री ची दुसरी स्री शत्रू असते..यात कुठे तरी पुरूष कधी कधी निमित्तमात्र असतो…कधी कधी तिला स्वातंत्र्य दिले तर ती त्याचा गैरफायदा देखिल घेते पण अशा महिला क्वचित असतात…

आज महिला दिनानिमित्ताने सकाळ पासून मोबाईल व्दारे तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होईल..पण कुठल्या तरी गल्लीबोळात तिची किंकाळी आज ही घुमत असेल. कुठे तरी तिला जिवंत जाळलं जाईल किंवा प्रेमात पुन्हा तिला फसवले जाईल….तिला आभाळाचे आमिष दाखवून पुन्हा तिचे पंख छाटले जातील… लालसेने, वासनेने डबडबलेल्या पुरूषी नजरा भर चौकात तिच्या नग्न शरीरावर बलात्कार करतील…

तिच्या गुणवत्तेची वाहवा करून तिच्या स्वप्नांना आमिष दाखवून, तिच्या देहाची बोली लावतील..

अशी कितीतरी वेळा कितीतरी ठिकाणी ती अगतिक होईल…आणि स्वीकारेल तुमच्या शुभेच्छा डोळ्याच्या कपारीतील अश्रू लपवत अन् जरा हसत हसत…

– प्रतिभा खैरनार, ( ख्यातनाम लेखिका,नांदगाव नाशिक)

विविध काव्यगौरव पुरस्कारांनी सन्मानित, ते पुरस्कार असे-  बाभूळ फुलं या कथासंग्रहाला पद्मगंगा फाउंडेशन तर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार.

बाभूळ फुलं या संग्रहाला सुर्योदय समावेशक मंडळ चा गिरजा कथा कीर पुरस्कार २०२३.

पडसावल्या संग्रहाला स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार, स्व. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था अहमदनगर यांचा बहिणाबाई काव्य पुरस्कार २०२३ पडसावल्या या संग्रहाला..

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचा गदिमा साहित्य पुरस्कार २०२३ पडसावल्या संग्रहाला

मातंग साहित्य परिषद पुणे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे वाड्मय पुरस्कार २०२४ पडसावल्या संग्रहाला

अक्षरसागर साहित्य मंच गारगोटी  राज्यस्तरीय पुरस्कार बाभूळ फुलं संग्रहाला

ॲग्रोवन न्यूज परिवार फलटण 2023 साहित्य पुरस्कार बाभूळ फुलं संग्रह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here