साॅरी मॅडम…

स्त्री दास्याचा तुरुंगांला सुरुंग लागायला, खुळचट नी छळवादी मनोराज्य जमिनदोस्त व्हायला बराच काळ जाऊ द्यावा लागला; तेव्हा कुठे नतद्रष्ट,पुरोगामी विचारांनी बाईपणाभोवती भोवती लादलेले कडक पहारे जरा सैल झालेत. पतंगाला ढिल दिल्याशिवाय ते आभाळाला गवसणी घालूच शकत नाही हे लक्षात आल्यावर फुले दांपत्यानं भिडेवाड्याच्या दाराला स्त्रीशिक्षणाचं पहिलं तोरण बांधलं होतं. सावित्रीच्या लुगड्याचा शेणगोळ्यांचा दर्प शुभमुहूर्ताचा सांगावा सांगून गेला होता. त्याची प्रचिती आज इथे प्रकर्षाने जाणवत आहे. सोसत ,भोगत हरेक प्रांतावर विजयखूणा उमटवत जाणारा तिचा प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे.

आज जिथे तिथे होणारा बाईपणाच्या जोशाचा जश्न ‘ एक दिवसाच्या’ जागतिक महिला दिनाची फिलिंग मात्र देऊन जातो. झालेल्या सगळ्या प्रवासाचा मागोवा घ्यायचा ,चर्चा घडवून आणायच्या,त्यात समाधान शोधायचं, नवे संकल्प आखायचे आणि ते तडीस नेण्यासाठी सज्ज व्हायचं ही ठरलेली कार्यक्रम पत्रिका असावी कदाचित.

त्या निःशंक आणि निर्भय शक्तीस्वरुपाला पाहून मन खरचं अतीव समाधानानं भरुन पावतं. मग कशात राहीला उणेपणा? हवं ते ते सगळं मिळवलं तर ! तिच्या पक्षात असणार्‍या कायद्यांनी उत्तुंग आत्मविश्वासही पेरलाय तिच्यात. तरीही आज…उदो उदो च्या कल्लोळात ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा ते उध्दारी, मुलगी म्हणजे लक्ष्मीचे रुप,बाई म्हणजे संसार रथाचं चाक’ अशा केवळ गोडाधोडाच्याच घोषणांचा नैवेद्य आजही तिच्यापुढे मांडला जातोय आणि तीही सत्कारमुर्ती असल्यामुळे त्या अतीव गोडाने तोंडात घास फिरत असला तरी ती बोलायला धजावत नाही. खरंतर ह्या ‘मोह मोह के धागें’चा आपल्यालाच मोह झालेला असतो. कौतूक ऐकत मिरवायला आवडतचं की सगळ्या बायकांना.सगळं मिळालं तरी अजूनही जुनेच संदर्भ इथे नाहक उगाळले जात आहेत. स्त्रीला सन्मान हवा,पुरुषी मुजोरीला थारा नको वगैरे वगैरे किती वेळा उगाळणार हे? कालपरत्वे महिला दिनाचे संदर्भ बदलायला नकोत ? ‘साॅरी मॅडम’ इथे जरा स्पष्टच बोलणार आहे. गुलामगिरी संपुष्टात आलेली आहे. संपूर्ण स्वातंत्र्य उपभोगत असतांना कुठेतरी खर्‍याखुर्‍या मुल्यांकडे दुर्लक्ष होतयं ; याचा आरसा कुणीतरी दाखवण्याची गरज आहे.

कौन कहता है कमजोर तू

जगत के पालनेकी डोर तू

प्रलय की आहट जहाँ वही आशाओंकी चहकती भोर तू …१

टूट रहा है कोई जंग में

बिखरनेसे पहले उठा ले , दाग तो चाँद पे भी है मगर

निर्भयासे उसेंभी मिटा दे..२

समाजापुढे ‘आ ‘वासून उभ्या असणार्‍या यक्षप्रश्नांचं निराकरण करायलाही स्त्रीकडेच आशेने बघीतलं जातं.स्त्री स्वातंत्र्याच्या आड मोबाईल नावाच्या इडीयट बाॅक्सच्या किती आहारी गेलीस तू.सोशल मिडीयावर चाललेला धुमाकुळ अल्पवयीन लेकरांच आयुष्य बरबाद करायला पुरेसा आहे म्हणून या बेबंद उधळणार्‍या वारुंचा लगाम तुलाच खेचावा लागेल हे लक्षात ठेव. बाईने पुढाकार घेतल्या शिवाय इतिहास घडलाच नाही ; क्रांतीही झाल्या नाहीत .फाटक्या संसाराचे भयाण चटके सोसून नवर्‍याला शिकायला प्रोत्साहित देणारी रमाई, राजविलास असूनही रयतेसाठी झिजणारी जिजाऊ,’सत्यशोधक’ होतांना नवर्‍याची सावली होणारी साऊ! केवळ एक तडजोड समाजाला सुरक्षित भविष्य देऊन जाते.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपटगृहात झळकला. तूफान प्रतिसादानं त्याला आपण डोक्यावरही घेतलं पण थोड्याच दिवसांनी ‘सत्यशोधक’ आला, तिथे आवर्जून जाणारं कुणीच नाही दिसलं,वाईट आहे ना सगळं ! नुसत्या अधिकारांना सोकावलेली वृत्ती थोडी डायव्हर्ट व्हायला हवी. केवळ तूच नव्हे तर तुझ्या सारख्या स्रीलिंगी संबोधल्या जाणार्‍या गायी, म्हशी, भूमाता या सर्वांवरच्या अन्यायाचं निवारण झालं पाहिजे.

वर्षानुवर्षे विघटन न होणार्‍या प्लास्टिकच्या पिशवीत सर्रास कचरा जमिनीवर कुठेही फेकून देणारे तुझे उच्चशिक्षितपणाचे सर्टीफिकेट इथे काय कामाचे? त्याच पिशव्या गायींच्या तोंडात घालून तिला मारणारं पाशवी पातक कुठे फेडायचं? त्याच गायी म्हशींच्या कासाला इंजेक्शन देऊन दुधाचं उत्पादन वाढवायचं आणि मातृत्वाला काळीमा फासायची. नाही सहन होत हे सगळं! गाय आणि माय एकच समजणारी आपली संस्कृती आणि एकीकडे तिच्या अस्तित्वावर घणाघाती प्रहार ! कित्ती हा विरोधाभास !

पावसाचं पाणी जमिनीत जिरवण्या ऐवजी बोअरला पाणी लागल्यावर पेढे वाटणार्‍या मानसिकतेचं काय करायचं? गाईचं वात्सल्य,भूमीच्या दातृत्वाचेही इथे सोहळे व्हायला नको का ? गाफील न राहता तुला जाणतेपणाने सगळी सूत्रं हातात घ्यावी लागतील.

तुझ्यातल्या देवत्वाला शत शत नमन .या देवी सर्व भूतेशू शक्ती रुपेन संस्थिता…..

-वैशाली शिंदे – भालेकर,(बीड, सहशिक्षिका,प्रा.शा.एरंडगाव ता. गेवराई जि.बीड)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here