स्त्री शक्तीची अनंत रूपे प्रतिभावंतांनी आपल्या कलाकृतीतून साकार केली. ज्यांना ती ‘माता’ म्हणून भावली, त्यांनी तिला ‘श्यामची आईच्या’ रूपात रेखाटले. कोणाला ती आदर्श पत्नीच्या रूपात रेखाटावी वाटली, तेव्हा तिला ‘रामाची सीता’ व्हावे लागले. सेवा, त्याग, प्रेम आणि समर्पण हे तिच्या जीवनाचे सूत्र झाले. ‘मांगल्याची देवता’ म्हणून तिचा गौरव सुरू झाला. या देवतेची सारी शक्ती पुरुषाला सुखी करण्यासाठी खर्ची पडावी, ही समाजाची अपेक्षा. पुरुषप्रधान व्यवस्थेने तिला कायम दुय्यमत्व देऊन स्वतःच्या सेवेसाठी हक्काचा गुलाम करून टाकले. सेवा हाच तिचा धर्म झाला. ही सेवा ती किती तत्परतेने आणि कार्यक्षमतेने करते यावर तिचे कौटुंबिक स्थान जोखले जाऊ लागले. स्त्रीचे आदराचे स्थानही कुठवर… तर जोवर ती पुरुषाचे वर्चस्व आनंदाने मान्य करते तोवर…!
मग या भुरळ पाडणाऱ्या आदर्शासाठी रुढी-परंपरेचे भाबडेपणाने पालन करणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढली. कुटुंब हे स्त्रीची कोंडी करणारे ठिकाण नाही. तर तिच्या कल्पकतेला, कष्टाला, शहाणपणाला संधी मिळवून देणारे ऊर्जा केंद्र आहे. स्त्रीची सारी ऊर्जा आज कुकर सारखी कुटुंबात कोंडली जात आहे.स्त्रीला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ती एक माणूस आहे. भारतीय घटनेने तिला समान हक्क दिले आहेत; पण परंपरेच्या वर्चस्वामुळे ते तिला सर्व अर्थाने प्राप्त झाले नाहीत. आता परिस्थिती बदलत आहे. ती जागी झाली आहे. आत्मसन्मानाची ओढ आणि अन्याय गुलामगिरीची चीड असणारी स्त्री हेच खरे दुर्गेचे जिवंत रूप आहे.
स्त्रीला स्वातंत्र्य दिल्यामुळे कुटुंबाचे आणि समाजाचे संतुलन बिघडेल ही भीती फोल आहे. आजवर स्त्रीला पुरेसे स्वातंत्र्य न दिल्यामुळे समाजाची प्रचंड हानी झाली आहे. स्त्रियांची सर्जनशीलता केवळ मुला बाळांना जन्म देणे आणि त्यांचे संगोपन करणे एवढ्या पुरतीच मर्यादा न ठेवता,विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविण्याची संधी तिला प्राप्त होणे महत्त्वाचे आहे. आणि त्यातच मानव जातीचे हित आहे. सध्या स्त्रिया कर्तबगारीची नवनवी शिखरे काबीज करताहेत. आपल्या पराक्रमाची, पुरुषाची मुद्रा या मातीवर उमटवत आहेत. आकाशाला गवसणी घालणारे यश त्यांनी संपादन केले आहे.
स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास व परिपोषण करणारे महत्त्वाचे साधन म्हणजे शिक्षण होय. स्त्री शिक्षण हा कोणत्याही समाज जीवनाच्या समृद्धीचा आणि प्रगतीचा मापदंड आहे. कोणत्याही समाजाची सांस्कृतिक पातळी ही त्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती कशी आहे त्यावरून ठरते. पुरुषाला शिक्षित करून आपण केवळ एका व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो.परंतु स्त्रीला शिक्षित करून संपूर्ण देशापर्यंत पोहोचू शकतो. महिला साक्षरतेच्या अभावामुळे देश कमकुवत होतो; म्हणूनच स्त्रियांना त्यांचा शिक्षणाचा अधिकार मिळणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यांना कोणत्याही प्रकारे पुरुषांपेक्षा कमी समजू नये.
ज्या मुली शिक्षण घेतात त्यांची तरुण वयात लग्न होण्याची शक्यता कमी असते आणि निरोगी, उत्पादक जीवन जगण्याची शक्यता जास्त असते. ते जास्त उत्पन्न मिळवतात. त्यांच्यावर सर्वात जास्त परिणाम करणाऱ्या निर्णयांमध्ये सहभागी होतात आणि स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी चांगले भविष्य तयार करतात. मुलींच्या शिक्षणामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते आणि विषमता कमी होते. शिक्षणामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होते. शिक्षण उपेक्षित महिलांना सक्षम करते. ‘कोणत्याही राष्ट्राची प्रगती मोजण्याची मोजपट्टी म्हणजे स्त्रीची उन्नती’ हे ऍनी बेझंट यांचे विधान अतिशय समर्पक आहे. यासाठी सत्तेत आणि निर्णय प्रक्रियेत स्त्रीचा माणूस म्हणून प्राधान्याने विचार झाला पाहिजे. वाचेने समतेचा पुकारा करण्यापेक्षा प्रत्यक्ष सर्व स्पर्शी समतेचा स्वीकार करणारी समाजव्यवस्था आकाराला आली पाहिजे. हेच दुर्गा तत्व आहे, याच दुर्गा तत्त्वाने भारतीय संस्कृतीच्या विकासाला नवे बळ नवी चालना मिळणार आहे.
-सौ.ज्योती सचिन कलुबर्मे,
(लेखिका या एक आदर्श, उपक्रमशील शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षिका असून उत्कृष्ट वक्त्या आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)