मंगळवेढा, दि.01: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेस आजपासून शांततेत सुरुवात झाली. मंगळवेढा तालुक्यात दहावीच्या परीक्षेसाठी तीन हजार चारशे आठ विद्यार्थी नोंदणी करण्यात आले होते. त्यापैकी 3359 विद्यार्थी तसेच 5 विद्यार्थी ऐनवेळी परीक्षेस प्रविष्ट झाल्याने 3364 विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली.
आज दहावीचा मराठी विषयाचा पेपर होता. परीक्षेत आज पासून सुरुवात झाली असून परीक्षा आज 01 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालावधीत पार पडणार आहेत. मंगळवेढा तालुक्यात दहावी परीक्षेसाठी मराठी माध्यमातून 3390 विद्यार्थ्यांनी तर उर्दू माध्यमातून 18 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे तसेच पाच विद्यार्थी ऐनवेळी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. आज 3364 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 49 विद्यार्थ्यांनी परीक्षेस दांडी मारली.
मंगळवेढा तालुक्यात परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यात इंग्लिश स्कूल मंगळवेढा, श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा, विद्यामंदिर हायस्कूल सलगर, नूतन हायस्कूल बोराळे, श्री बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर, माध्यमिक आश्रम शाळा व ज्युनिअर कॉलेज येड्राव – खवे, आंधळगाव प्रशाला आंधळगाव, महासिद्ध विद्यामंदिर डोणज, माध्यमिक आश्रम प्रशाला व ज्युनिअर कॉलेज बालाजीनगर, एम.पी. मानसिंगका हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सोड्डी, श्री कामसिद्ध विद्यामंदिर खुपसंगी, स्वामी विवेकानंद विद्यालय गुंजेगाव या अकरा परीक्षा केंद्रावर परीक्षेत सुरुवात झाली.
दहावी परीक्षेसाठी सर्व परीक्षा केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात आले असून आज मराठीच्या पेपर कालावधीत ठिकठिकाणी भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली. सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीतपणे चालू असल्याचे आढळून आले. परीक्षा कालावधीत राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील भरारी पथकाकडून वेळोवेळी परीक्षा केंद्रावर भेटी होणार आहेत. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्य मंडळ स्तरावर दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विषयाच्या परीक्षेसाठी प्रत्येकी दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आलेला आहे.
मंगळवेढा तालुक्यात दहावी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका शिक्षण विस्तारअधिकारी तथा दहावी परीक्षेचे तालुका परीरक्षक डॉ. बिभीषण रणदिवे, प्रकाश साळुंखे, विनायक खांडेकर, हरी लोखंडे, केंद्रसंचालक सुहास माने, भवानराव इनामदार इनामदार, रवींद्र वाघमारे, भारत बंडगर, भारत पाटील, श्री. भोरे डी.पी., संगन्ना सारवडे, गणपती पवार, बसवराज कोरे, श्री. चौगुले बी.बी., शशिकांत ढगे यांच्यासह सहायक परीरक्षक तसेच सर्व परीक्षा केंद्रावर काम करणारे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.









