शाब्बास बेटा, शिक्षकेतर कर्मचाऱ्याची मुलगी बनली अधिकारी

महाराष्ट्र लोकसेवा आयोग जलसंपदा विभागाच्या परीक्षेत तेजस्वी लेंडवेचे यश

श्रीकांत मेलगे/ ब्यूरो चीफ, झेप संवाद न्यूज

मंगळवेढा, दि.29 : मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे सारख्या ग्रामीण भागातील व शिक्षकेतर पदावर काम करणाऱ्या भारत लेंडवे यांची कन्या तेजस्वी भारत लेंडवे हिने नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत जलसंपदा विभागाच्या सहाय्यक अभियंता श्रेणी 2 मध्ये यश संपादन केले आहे.

तेजस्वी लेंडवे हिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लेंडवे चिंचाळे येथे, इयत्ता 5 वी ते 8 वी चे शिक्षण श्री सिद्धनाथ विद्यालय लेंडवे चिंचाळे, इयत्ता 9 वी ते 12 वी चे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय पोखरापुर येथे झाले असून स्थापत्य अभियांत्रिकी विषयात स्वेरी कॉलेज गोपाळपूर येथे पदवी संपादन केली. दरम्यान अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना ही गेट परीक्षेतही पात्र ठरली होती. शालेय जीवनात 9 वी ते 11 वीचे मध्ये कबड्डी स्पर्धेत देशपातळीवर ही तिने नाव कमविले होते.

तेजस्वी लेंडवे हीचे वडील भारत लेंडवे हे श्री सिद्धनाथ विद्यालय लेंडवे चिंचाळे येथे लिपिक पदावर कार्यरत आहेत तर आई कांचन या गृहिणी असून त्यांचे शिक्षण फक्त झालेले आहे. तिची मोठी बहीण स्नेहल हिचेही बी.एस्स.सी. अग्री पर्यातचे शिक्षण झाले असून तीही सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत आहे. दोन लहान भाऊ असून संकेत बी.एस्स.सी.चे तर समर्थ अकरावीत शिक्षण घेत आहे. अशी सारी कौटुंबिक पार्श्वभूमी. वडील शिक्षकेतर कर्मचारी तर आई गृहिणी. आपली मुले शिकली पाहिजेत ती मोठ्या पदावर विराजमान झाली पाहिजेत यासाठी लेंडवे कुटुंबाचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. या प्रयत्नांमुळे त्यांची मुलगी तेजश्री आज मोठ्या पदावर विराजमान झाली आहे तर इतर मुलांनीही त्याच वाटेवर प्रवास करीत यश संपादन करण्याचा निर्धार केला आहे.

तेजस्वी लेंडवे हिने झेप संवाद न्यूजशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत सहाय्यक अभियंता पदी निवड झाल्याबद्दल खूप आनंद होत असून आपल्याला आई, वडील, बहिण, भाऊ यांचे खूप पाठबळ होते त्यामुळे आपण हे यश संपादन करू शकलो. नेहमी आपल्या मनामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत यश संपादन करायचे आहेच हा ठाम निर्धार, व्यक्तिगत जीवनात शिस्त आणि अपयश आले तरी खचून न जाता सहनशीलता अंगी बाळगणे यामुळेच आपण हे यश संपादन करू शकलो. पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा यामध्ये भरपूर वेळ असतो त्यावेळी आपण सातत्य कायम ठेवून अभ्यास केला तर तर यश तुमचेच आहे. लहानपणापासून आजपर्यंतच्या शैक्षणिक वाटचालीत कुटुंबातील प्रत्येकजण, शिक्षक, मित्रपरिवार, नातेवाईक यांच्यामुळेच आपणाला यशापर्यंत पोहचण्याचा प्रवास करता आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here