मंगळवेढा, दि.25: एकमेकांच्या मैत्रीपूर्ण सोबतीमुळेच संसाररथ पुढे नेऊन आम्हाला आमच्या क्षेत्रात आदर्शवत कार्य करता आले असे मत प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आदर्श दाम्पत्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात पुरस्कारप्राप्त दाम्पत्यांनी व्यक्त केले.
मंगळवेढा येथील महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे दामाजीनगर शाखेच्या पाचव्या शिवार साहित्य संमेलनात प्रेरणा प्रतिष्ठानच्या आदर्श दाम्पत्य पुरस्कारांचे वितरण मंगळवेढा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती ॲड.नंदकुमार पवार यांचे हस्ते आणि म.सा.प. पुणेचे सोलापुर जिल्हा प्रतिनिधी कल्याण शिंदे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अ.भा.नाट्य परिषदेचे मंगळवेढा शाखा अध्यक्ष डाॅ.सुभाष कदम, सजग नागरीक संघाचे अँड.भारत पवार, कृषिभुषण अंकुश पडवळे, कृषिनिष्ठ शेतकरी तात्यासोा चव्हाण, शिवार साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष अँड.विनायक नागणे, महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजी नगर शाखेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश जडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यंदाचे आदर्श दाम्पत्य पुरस्कार प्रा.शिवाजीराव काळुंगे व प्रा. शोभा काळुंगे, संजीव कवचाळे व जयश्री कवचाळे ,डाॅ.शाकीर सय्यद व डाॅ.शबनम सय्यद या दाम्पत्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रा. शोभा काळुंगे, जयश्री कवचाळे,डाॅ.शबनम सय्यद यांनी मनोगत व्यक्त करीत असताना पती व पत्नी ही संसार रथाची दोन चाके आहेत. एकमेकांच्या प्रेरणेशिवाय आम्हाला आमच्या कार्यात ठसा उमटविता आला नसता. संसार म्हटला ही थोडेफार तात्पुरते मतभेद आलेच परंतु या मतभेदला हसतखेळत घेतले असे सर्वच पुरस्कारप्राप्त सौ. नी सांगितले तसेच आपला संसार प्रवास उलगडताना अनेक कौटुंबिक किस्सेही सांगून सर्वांना हसवलेही.
यावेळी मंगळवेढा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती ॲड.नंदकुमार पवार यांनी सांगितले की, मंगळवेढा तालुक्याला खूप मोठी साहित्य परंपरा आहे. विविध बाबतीत मंगळवेढा तालुक्यात पुढे नेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यात काही मंडळीही आपापल्या क्षेत्रात आदर्शवत काम करीत आहेत. तीन राजांच्या राजधानीचे मुख्य केंद्र असलेल्या मंगळवेढा तालुक्याला भविष्यात निश्चितच चांगले दिवस येतील. चांगल्या माणसाच्या सोबतीने व विचाराने चाललेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजी नगर शाखेचे कार्य कौतुकास्पद आहे व मंगळवेढेकरासाठी ही गौरवाची बाब आहे. यावेळी म.सा.प. पुणेचे सोलापुर जिल्हा प्रतिनिधी कल्याण शिंदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
आदर्श दाम्पत्य पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रास्ताविक प्रा.डॉ. दत्तात्रय सरगर यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गोरख जाधव यांनी केले.