मंगळवेढा, दि.25: मंगळवेढा हे ज्वारीचे कोठार आहेच परंतु साहित्याचेही कोठार आहे. या शिवार साहित्य संमेलनात वेगवेगळ्या क्षेत्रातील जाणकार मंडळी एकत्र आलेले पाहून समाधान वाटते. साहित्य सर्वांना जुळवून घेते हे या साहित्य संमेलनातून दिसून येते. ज्या मातीने आपणाला समृध्द केले त्याच मातीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे या संमेलनातून दिसून येते असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापिठ सोलापुरचे सह कुलसचिव प्रा.डाॅ .शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
ते महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे दामाजीनगर शाखेच्या वतीने आयोजित रामचंद्र नागणे साहित्यनगरीत होत असलेल्या पाचव्या शिवार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. शिवार साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्योजक सोमनाथ आवताडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती ॲड.नंदकुमार पवार, ॲड.रमेश जोशी, ॲड.दत्तात्रय तोडकरी, स्वागताध्यक्ष अँड.विनायक नागणे, महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजीनगर शाखेचे अध्यक्ष प्रा.प्रकाश जडे, माजी नगरसेविका अनिता नागणे आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनास ग्रंथापुजन व ग्रंथदिंडीने सुरुवात करण्यात आली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. डॉ. शिवाजी शिंदे पुढे म्हणाले, संस्कृती, समाज आणि साहित्य यांचा अनन्य संबंध आहे, कारण समाजामध्ये जे घडतं तेच साहित्यामध्ये येते. ग्रामीण भागामध्येच नव्हे आपल्या समाजामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडतात त्या प्रसंगाचे, त्या घटनेचं एक अभिरुप साकार करण्याचे काम कोण करत असेल तर ते साहित्यीक करतात. आपल्या शेतकऱ्याचं जीवन साहित्याच्या माध्यमातून आपल्याला काही प्रतिबिंबित करता येते का? हे पाहणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर शिवार सारख्या संमेलनामधून त्याच्या जीवना विषयीचा आलेख आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. चांगल्या साहित्याची दखल आज समाजामध्ये तेवढ्या ताकतीने घेतली जात नाही असं मला या ठिकाणी खूप खेदाने आणि दुःखाने म्हणावं लागतं. काही प्रस्थापित, काही नवोदित असे काही गट साहित्य क्षेत्रामध्ये निर्माण झालेले आहेत. नवोदितांमध्ये खूप चांगली माणसं साहित्य लेखन करतात. नवोदित अतिशय दर्जेदारपणे, सकसपणे लिहितात परंतु तेवढ्या ताकतीने त्यांचे साहित्य समाजामध्ये समीक्षकांच्या माध्यमातून उजेडात आणण्याचे काम केलं जात नाही अशी मला या ठिकाणी खंत व्यक्त करावीशी वाटते.
साहित्य क्षेत्रामध्ये काही बुजगावणे असतील तर आपण त्यांना बाजूला केले पाहिजे. ते अस्सल आहे, जे खरं आहे ते आपण समाजाच्या पुढे आणलं पाहिजे म्हणून ही भूमिका या मंचावरून मांडत असताना खोटे मुखवटा धारण केलेल्या लोकांचा तटस्थपणे प्रचार केला पाहिजे. साहित्यिक भूमिका घेऊन लिहित नाहीत आणि लिहिली तरी ती भूमिका वारंवार बदलतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असणाऱ्या काळात आपण जर भूमिका घेऊन लिहिलं तसेच त्या भूमिकेला अनुरूप लेखन आपण केलं तर त्याला वाचक वर्ग चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. बोलीभाषेमधून जे साहित्य येतं त्या साहित्याला एक रांगडेपणा, ठसकेबाजपणा, सच्चेपणा आहे. असे साहित्य समाजापुढे येणे खऱ्या अर्थाने आजच्या काळाची गरज आहे.
उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रास्ताविक प्रा.विश्वनाथ ढेपे, निवेदन भारती धनवे – नागणे यांनी तर आभार प्रा.डॉ.दत्तात्रय सरगर यांनी मानले.