मंगळवेढा, दि.24: सोलापूर महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सोलापूर व राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.00 वाजता हनुमान मंदिर सलगर बुद्रुक (ता.मंगळवेढा) येथे निर्यातक्षम डाळींब उत्पादन तंत्रज्ञान विषयावर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
राष्ट्रीय स्तरावरील भौगोलिक मानकरी प्राप्त असलेले डाळिंब पिकाचे क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात वाढायला पाहिजे. डाळिंब पिकामध्ये चांगल्या दर्जाचे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावला पाहिजे. वातावरणातील बदलामुळे वाढत चाललेल्या रोग व किडींवर अत्यंत कमी उत्पादन खर्चात मात करता यावी व गुणवत्तापूर्ण निर्यातक्षम डाळींबाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवा या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमासाठी आत्मा सोलापूरचे प्रकल्प संचालक मदन मुकणे हे उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर येथे निवृत्त प्रमुख शास्त्रज्ञ व पूर्व संचालक डॉ. जोत्स्ना शर्मा, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सोमनाथ पोखरे, शास्त्रज्ञ डॉ.मल्लिकार्जुन, डॉ. चंद्रकांत अवचारे मार्गदर्शन करणार आहेत. सदर पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे अशी आवाहन मंगळवेढा तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे यांनी केले आहे.