मंगळवेढा, दि.24 : सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार, अमृत महाआवास अभियान पुरस्कार, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पंढरपूर येथे पार पडला. या सोहळ्यात मंगळवेढा तालुक्यातील बालाजीनगर (लमाणतांडा) गावाने मंगळवेढा तालुक्यातील आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार पटकावीत दहा लाखाचे बक्षीस जिंकली आहे. तालुक्यातील छोटेशे गाव म्हणून ओळख असलेल्या बालाजीनगरने हा पुरस्कार मिळवीत हम भी कुछ कम नही हे दाखवून दिले आहे.
बालाजीनगर गावास आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तर आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, उपमुख्याधिकारी ईधाधिन शेळकंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. बालाजीनगर गावाच्या वतीने हा पुरस्कार सरपंच अंजना राठोड, माजी सरपंच हरिश्चंद्र राठोड, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ पवार, ग्रामसेवक विनायक भोजने यांच्यासह बालाजीनगर ग्रामस्थानी स्वीकारला. यावेळी जिल्हास्तरावरील पुरस्कारप्राप्त माढा तालुक्यातील वडाचीवाडी आऊ या गावास प्रदान करण्यात आला.
स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण रक्षण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर अशा मुद्द्यांवर 100 गुण देऊन प्रत्येक तालुक्यातून एक आणि जिल्ह्यातून एका गावास आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. तालुकास्तरावर प्रथम आलेल्या गावास प्रत्येकी दहा लाख रुपयांचे तर जिल्हास्तरीय गावास 40 लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. प्रत्येक कुटुंबाकडे स्वच्छतागृह, दारूबंदी, प्लास्टिक बंदी, वृक्ष लागवड, शाळा, आरोग्य सुविधा, स्वच्छता, ग्रामपंचायतीची ऑनलाइन सुविधा, बचतगटांशी अधिकाधिक महिला संलग्न, ग्रामपंचायतीचा कर 100 टक्के वसूल, अशा बाबींचाही विचार निवडीवेळी करण्यात आला आहे.
बालाजीनगर बरोबर या गावांनी पुरस्कार पटकाविला असून तालुका व गावांची नावे पुढीप्रमाणे- अक्कलकोट – वागदरी, बार्शी – अंबाबाईची वाडी, करमाळा – खडकी, माढा- वडाचीवाडी आऊ (जिल्हास्तरीय पुरस्कार), माळशिरस – पुरंदावडे, मोहोळ – आष्टी, उत्तर सोलापूर – कौठाळी, पंढरपूर – तिसंगी, सांगोला -वाकी शिवणे, दक्षिण सोलापूर -दिंडुर