सलगर बुद्रूक, दि.24: सलगर बुद्रुक (ता.मंगळवेढा) येथे शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबवित यंदा शिवजयंती साजरी करण्यात आली. तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून मंडळाने यंदाचा मिरवणुकीसाठी होणारा खर्च टाळून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तब्बल 162 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करून उपक्रम राबविण्याचे काम केले. जिल्हाभरातून या अनुकरणीय उपक्रमाचे कौतुक होत आहे.
यावेळी आमदार समाधान आवताडे, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, रामचंद्र जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश जाधव, वैभव कदम, अनिल कदम, सागर गंगधरे, दत्ता कदम, स्वप्निल मस्के, काका कदम, नितीन टिक्के, यावेळी उपस्थित होते. शिवजयंतीला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप आलेले असून मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात शिवजयंतीच्या निमित्ताने बौद्धिक, सांस्कृतिक ,धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमातून लोकांचे प्रबोधन व त्याबरोबर मनोरंजनही होते. ठिकठिकाणी सुरू असणारे उपक्रम तालुक्यातील नागरिकांना विधायक वाटेवर चालण्यासाठी दिशादायक ठरत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढली जाते व या मिरवणुकीवर लाखो रुपयांचा खर्च केला जातो. या मिरवणुकीत तरुणाईचा आनंद सामावलेला असतो परंतु मिरवणुकीच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत यंदाची दुष्काळी परिस्थिती व दहावी बारावी परीक्षेचा कालावधी ओळखून सलगर बुद्रुक येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 162 विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण करून एक वेगळा आदर्श इतर मंडळासमोर ठेवला आहे.
सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांना शाळेविषयी गोडी निर्माण व्हावी याकरीता छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळाने घेतलेला उपक्रम हा चांगला आहे. जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांची निकड लक्षात घेऊन असे उपक्रम सर्वच ठिकाणी राबविणे आवश्यक आहे.
रमेश जाधव,
– अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलगर बुद्रुक